मार्च महिन्यात बीजिंगसाठी कौलालंपूरहून २३९ प्रवाशांना घेऊन निघालेले मलेशियन विमान बघता बघता गायब झाले. त्याचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही. तेव्हापासून या विमानाचे काही अवशेष सापडतात का?, याचा शोध घेणे सुरू आहे. आठ मार्चला जेव्हा हे विमान बेपत्ता झाले तेव्हा नेमके काय झाले, विमान बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर नेमका तपास कसा आणि के व्हा सुरू झाला ते आतापर्यंत तपास करणाऱ्यांच्या हातात विमानाच्या माहितीशिवाय काहीही नाही..हा सारा प्रवास ‘द व्हॅनिशिंग अ‍ॅक्ट’ नावाच्या चित्रपटातून पाहयला मिळणार आहे.
‘कामसूत्र थ्रीडी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक रूपेश पॉल ‘द व्हॅनिशिंग अ‍ॅक्ट’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. मलेशियन विमानाच्या तपासाची कहाणी फार विचित्र आणि तितकीच नव्या गोष्टी मांडणारी आहे. एकाचवेळी अनेक देशांनी या विमानाच्या शोधकार्यासाठी मदत देऊ केली आणि ते कामाला लागले. मात्र, असे असूनही विमानाचा पत्ता लागलेला नाही. हे विमान हिंदी महासागरात कोसळले असावे, असा अनुमान काढल्यानंतर त्याचे अवशेष तरी सापडतात का?, यासाठी क सून शोध घेतला जातो आहे. ही घटनाच इतकी विचित्र पद्धतीची आहे की त्या घटनेने प्रभावित होऊन चित्रपट काढला, असे म्हणणे अन्यायकारक ठरेल, असे मत रूपेश पॉल यांनी व्यक्त केले आहे.
देशोदेशीच्या पत्रकारांनी या शोधकार्यासंबंधी लिहिलेल्या रिपोर्ताजचाही वापर या सिनेमासाठी करून घेण्यात आला असल्याची माहिती पॉल यांनी दिली. या चित्रपटातून विमानाचे तपासकार्य एका सलग धाग्यात मांडणी केलेले दिसेल. त्यामुळे या विमानाबरोबर गायब झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वासही पॉल यांनी व्यक्त केला. ‘कामसूत्र थ्रीडी’ चित्रपटानंतर खरेतर रूपेश पॉल यांनी नरेंद्र मोदी यांच्या चरित्रपटावर काम सुरू केले होते. मात्र, आता निर्माता मितेश पटेल आणि आपल्यात मतभेद झाल्यामुळे आपण मोदींच्या चित्रपटावर काम करत नसल्याचे पॉल यांनी स्पष्ट केले.