अक्षय कुमार म्हटलं की, ‘खिलाडी’ चित्रपट मालिका हे वेगळे सांगायलाच नको. काही फिल्मी-नाती ही अशीच चित्रपट सुपर हिट होत होत घट्ट होतात. असा ‘हुकमाचा खिलाडी’ चक्क ‘मिस्टर बॉण्ड’ कधी बरे झाला हा तुमचा प्रश्न असेलच. त्याचे उत्तर आहे, १९९२ साली. आता ‘बॉण्डपट’ ही मूळ कल्पना अर्थातच विदेशी. साहसी आणि गेम चेंजर असा सुंदर ललनांच्या सहवासातील पुरुष व्हीलन टोळीचा पर्दाफाश करतो आणि छान हसतच पिस्तूलाशी दोस्ती करतो. हे सगळे करीत असतानाच त्याच्या याच कर्तृत्वावर लट्टू वा फिदा झालेली मोहक-मादक नायिका आहेच. इंग्लिश चित्रपटातील हा फॉर्मुला हिंदीत येणे स्वाभाविकच.
कॅमेरामॅन व दिग्दर्शक रवि नगाईच याने जीतेन्द्रला हेच रुपडं देऊन ‘फर्ज’ बनवला. जीतेन्द्रला याच चित्रपटाने ‘जम्पिंग जॅक’ ही इमेज दिली. यात बबिता त्याची प्रेयसी होती. आता हा ‘बॉण्ड फॉर्मुला’ सुपर हिट ठरल्याने याच पठडीतील आणखीन काही चित्रपट येणारच. त्यात काही अॅक्शन व नृत्याचा आणखीन मसाला भरला गेला इतकेच. दीपक बाहरीचा ‘एजेंट विनोद’ (महेंद्र संधु), रवि नगाईच याचाच ‘सुरक्षा’ (मिथुन चक्रवर्तीचा यातील ‘गनमास्टर जी-नाईन’ खूप लोकप्रिय झाला), सत्तरच्याच दशकात हे हिंदी बॉण्डपट हिट होताच राजेश खन्ना 007 या बॉण्डपटाचे निर्माते शंकर बी. सी. यांनी मोटारसायकलवरून राजेश खन्नाची जबरा एन्ट्री व कवेत जाहीरा, अशा दृश्याने आपल्या चित्रपटाचा दणक्यात मुहूर्त केला. पण हा चित्रपट बनलाच नाही.
अक्षय कुमारचा ‘मिस्टर बॉण्ड’ आला आणि गेला, असे का झाले असावे? कारण एकच त्याचा हा अगदीच सुरुवातीचा चित्रपट. तोपर्यंत त्याला सूर सापडला नव्हता. अक्षय आनंद नावाचाही त्या सुमारास एक हीरो होता. असे दोन्ही अक्षय स्वतःची ओळख निर्माण करण्यास चाचपडत होते. त्याच्या ‘सौंगध’चेच निर्माता केशु रामसे व दिग्दर्शक राज एन. सिप्पी यांनीच या बॉण्डपटात अक्षय कुमारकडून सगळीच साहसे करुन घेतली. रामसे तसा आपल्या बंधुंसोबत भूतपट-भयपटात मुरलेला. त्याला बॉण्डपट तसा नवाच. राज एन. सिप्पी हा ‘इन्कार’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘कयामत’ अशा काही चित्रपटातून कौशल्य दाखवणारा. त्यालाही तसा बॉण्डपट नवाच. जे काही असेल ते. अक्षय कुमारनेही बॉण्डपट साकारलाय यात तत्थ आहे. रुचिका पांडे, शीबा, साथी या नावाच्या नायिका म्हणून त्याला बिलगल्यात. पंकज धीर त्यात खलनायक होता. खुद्द अक्षय कुमारला तरी आपले हे रुप आणि चित्रपट आठवतं असेल काय?
दिलीप ठाकूर