अनिल कपूर आणि अर्जुन कपूर या काका-पुतण्यांच्या जोडीने रंगवलेला अनीस बाज्मी कृत ‘मुबारकाँ’ हा निखळ विनोदी चित्रपट आहे. त्याला कौटुंबिक नाटय़ाचा मुलामा इतका जास्त चढला आहे की. चित्रपट भरपूर हसवतो पण मनात ठसत नाही. अर्जुन कपूरने विनोदाचा डबल बार उडवला असला तरी या चित्रपटात त्याचे काका अनिल कपूर यांच्या विनोदी फटक्यांचा धमाका जास्त आहे. त्यामुळे हा चित्रपट पुतण्यापेक्षा त्याच्या काकासाठी आणि पर्यायाने प्रेक्षकांसाठी ‘मुबारक’ ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मुबारकाँ’सारख्या चित्रपटांचा उद्देश हा केवळ आणि केवळ मनोरंजन एवढाच आहे. त्यामुळे खरे म्हणजे अशा चित्रपटांची कथा विचारात घ्यायची नसते. पण ‘मुबारकाँ’च्या बाबतीत कथा लक्षात घ्यायला हवी. याचे कारण अनेक व्यक्तिरेखा आणि त्यांची सांगड घालत विनोदाचा डोस पाजण्यात मातबर असलेल्या दिग्दर्शकांमध्ये अनीस बाज्मी हे नाव अग्रणी आहे. परिस्थितीतून निर्माण होणारा विनोद हे बाज्मी यांच्या चित्रपटाचे बलस्थान आहे. त्यामुळे कथेतून अशी विनोदी परिस्थिती निर्माण करण्याचे आव्हान दिग्दर्शकाने या चित्रपटात पेलले आहे. चरण आणि शरण (अर्जुन कपूर) हे दोन जुळे भाऊ लहानपणीच विलग झाले आहेत पण ते कुठल्या मेळ्यात नव्हे. आई-वडील अपघातात दगावल्यावर एकाला लंडनमध्ये आपल्या बहिणीकडे आणि दुसऱ्याला पंजाबमध्ये आपल्या भावाकडे सोपवून काका कर्तार सिंग (अनिल कपूर) यांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे. मात्र चरण आणि शरणच्या लग्नाच्या निमित्ताने कर्तार सिंग पुन्हा अडचणीत सापडतात. लंडनमधल्या करणचे स्वीटीवर (इलियाना डिक्रुज) प्रेम आहे. पण अचानक झालेली स्वीटीची आणि करणच्या ‘आई’रूपी आत्याची (रत्ना पाठक शाह) भेट त्याला महागात पडते. तर चरणला आपली गर्लफ्रेंड एक मुसलमान तरुणी आहे हे वडीलरूपी काका बलदेव (पवन मल्होत्रा) यांना सांगण्याचे धाडस नाही. या दोघांच्या कथेबरोबर कर्तारच्या डोक्यावर आणखी एका समांतर नात्याची जबाबदारी आहे ती म्हणजे आपल्या भावा-बहिणीला एकत्र आणण्याची..

नात्यांमधले ताणेबाणे सांभाळताना त्यातून चरण-शरणचे लागलेले क्रॉस कनेक्शन आणि हा सावळागोंधळ आपल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करणारा कर्तार काका यातून गुंतागुंत वाढत राहते. अनिल कपूर यांनी कर्तार सिंग ही भूमिका झक्कास केली आहे. खरेतर या चित्रपटातील सगळ्याच अनुभवी कलाकारांची जुगलबंदी हेही या चित्रपटाचे मोठे आकर्षण आहे. विशेषत: रत्ना पाठक शाह, पवन मल्होत्रा आणि अनिल कपूर या तिघांनीही यातला कौटुंबिक नात्याचा धागा घट्ट पकडून ठेवलाय. त्यामुळे खालच्या फळीत असलेल्या अर्जुन कपूर, इलियाना डिक्रुझ यांची कामगिरी कमी असली तरी त्याची उणीव जाणवत नाही. अथिया शेट्टीला चित्रपटात फार मोठी भूमिका नाही. इनमिन एक गाणे आणि काही प्रसंग तिच्या वाटय़ाला आले आहेत. अर्जुन कपूरने आपल्या स्टाईलमध्ये हे दोन्ही जुळे भाऊ रंगवले असले तरी विनोदाचे तारू काका अनिल कपूर यांनीच सांभाळले आहे हेही तितकेच खरे. चित्रपटातील चटकदार संवाद, त्याची वेगळी मांडणी यामुळे चित्रपट पाहताना कंटाळा येत नाही. अर्थात उत्तम विनोदी चित्रपट म्हणून ‘मुबारकाँ’ लक्षात राहणाऱ्यांतला नाही.

चित्रपट :  मुबारकाँ

  • दिग्दर्शक- अनीस बाज्मी
  • कलाकार- अर्जुन कपूर, अनिल कपूर, इलियान डिक्रुज, नेहा शर्मा, अथिया शेट्टी, रत्ना पाठक शाह, पवन मल्होत्रा, राहुल देव आणि करण कुंद्रा.
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mubarakan movie review
First published on: 29-07-2017 at 05:00 IST