गेल्या काही दिवसांपासून लविना लोध ही चर्चेत आहे. तिने महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे बॉलिवूडमधील डॉन आहेत. त्यांच्या एका फोनमुळे एखाद्या कलाकाराचे आयुष्य उद्धस्त होऊ शकते असा खळबळजनक आरोप केला होता. आता महेश भट्ट यांनी हे आरोप फटाळले असून लविना विरोधात मानहानीचा दावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लविना ही महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवाल याची पत्नी आहे. भट्ट कुटुंबीयांचे म्हणणे आहे की लविना त्यांच्या फ्लॅटवर हक्क बजावत आहे आणि तो फ्लॅट खाली करण्यासाठी कारवाई केल्यानंतर तिने हे पाऊल उचलले आहे. महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांनी नुकताच निवदेन काढलं आहे. त्यामध्ये लविना आणि तिचा पती सुमित सबरवाल यांच्यामध्ये २०१६मध्ये वैवाहिक वाद सुरु होते. सुमित आमच्या विशेष फिल्म कंपनीमध्ये काम करतो. काही दिवसांपूर्वीच त्याने हक्क दाखवलेला हा प्लॅट खाली करण्यास सांगितले होते. त्यानंतर अभिनेत्रीने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर निशाणा साधला आहे.

भट्ट कुटुंबीयांनी लविनाने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.त्यांनी लविना विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक कोटी रुपयांचा मानहानिचा दावा ठोकला आहे.

काय म्हणाली होती लविना लोध?

“माझं नाव लविना लोध असून हा व्हिडीओ मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी करत आहे. माझं लग्न महेश भट्टच्या भाच्यासोबत सुमित सभरवालसोबत झालं असून मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. सुमित ड्रग्स सप्लाय करतो. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे फोटो आहेत. यात अमायरा दस्तूर आणि अशा अनेक अभिनेत्रींचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहेत आणि हे फोटो तो दिग्दर्शकांना दाखवतो. तो कलाविश्वात मुली सप्लाय करतो.या सगळ्याची कल्पना महेश भट्टला आहे. महेश भट्ट या कलाविश्वातला सगळ्या मोठा डॉन आहे”

पुढे ती म्हणते, “ही सगळी इंडस्ट्री तोच चालवतो आणि जर तुमच्याकडून नियमांचं उल्लंघन झालं तर ते तुमचं जगणं कठीण करुन टाकतात. महेश भट्टने अनेकांचे आयुष्य उद्धवस्त केले आहेत. त्यांनी अनेक कलाकार, दिग्दर्शक, कंपोजर्स यांच्याकडून काम काढून घेतली आहेत. ते एक फोन करतात आणि समोरच्याचं काम काढून घेतात. विशेष म्हणजे हे कोणाच्या लक्षातदेखील येत नाही. अशा प्रकारे त्यांनी अनेकांचं आयुष्य़ बर्बाद केलं आहे. त्यांच्याविरुद्ध मी तक्रार दाखल केल्यानंतर ते सातत्याने मला त्रास देत आहेत. मला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. एकतर मी त्यांच्याविरोधात एनसी करायला गेले तर कोणत्याच पोलीस ठाण्यात एनसी नोंदवून घेतली जात नाही, आणि जर का ती घेतली तर कोणीही त्यावर काहीच कारवाई करत नाही. जर पुढे जाऊन माझ्यासोबत किंवा माझ्या कुटुंबासोबत काही कमी जास्त झालं तर त्याला महेश भट्ट, सुमित सभरवाल, साहिल सेहगल, कुमकुम सेहगल हे जबाबदार असतील” असे आरोप लविनाने केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh bhatt and mahesh bhatt denies allegation of lavina lodh issued statement avb
First published on: 31-10-2020 at 14:29 IST