scorecardresearch

‘वायझेड’मध्ये मुक्ता बर्वेची एण्ट्री

वायझेड सिनेमात पाहायला मिळणार पर्ण, मुक्ता आणि सईचं नवं आणि अस्सल व्हर्जन

वायझेड सिनेमाच्या आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या टीझर्समध्ये पर्णरेखा (सई ताम्हणकर) आणि अंतरा (पर्ण पेठे) या दोघींची ओळख झाली असली, तरी सिनेमात या दोघींच्या जोडीला आणखी एक ‘वायझेड’ व्यक्तीरेखा पाहायला मिळणार आहे आणि ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे.त्यामुळे मुक्ता, सई आणि पर्ण अशा तिघींच्या अभिनयातून ‘वायझेड’चं ‘फीमेल व्हर्जन’ पाहायला मिळणार असल्याचं सिनेमाचा दिग्दर्शक समीर विद्वांसने सांगितलं.
समीर म्हणाला, ‘सिनेमाबद्दलची लोकांची उत्सुकता सतत वाढत राहावी या हेतूने आम्ही त्याच्या पोस्टरपासून एक एक गोष्ट सावकाशीने उलगडत गेलो आणि आता मुक्ताची एंट्री झाली आहे. मुक्ता बर्वे या सिनेमात आतापर्यंत कधी न पाहिलेल्या पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. किंबहुना मुक्ता, सई आणि पर्ण या तिघींच्या भूमिका प्रेक्षकांना सुखद धक्का देणाऱ्या असतील. वेगळा लूक आणि तितकीच वेगळी व्यक्तीरेखा या तिघींनी‘वायझेड’मध्ये साकारली आहे. आतापर्यंतचे सिनेमाचे टीझर्स पाहाता तो सागर आणि अक्षय या प्रमुख पुरुष कलाकारांचा सिनेमा वाटत असला, तरी तिघींच्या भूमिका सिनेमाचा फार महत्त्वाचा भाग आहे.’
‘वायझेड’मध्ये सई पर्णरेखा नावाच्या अतिशय अध्यात्मिक मुलीच्या, ‘प्राक्तन, निरामय, भक्तीचा अंगारा’ अशा भाषेत बोलणाऱ्या भूमिकेत दिसेल, तर पर्णने संस्कृत शिकत असलेल्या आधुनिक मुलीची भूमिका साकारली आहे. मुक्ताची या सिनेमातली भूमिका नेमकी कशी आहे हे अजून गुलदस्त्यात असलं, तरी ‘वायझेड’च्या मुक्ताचा समावेश असलेल्या पोस्टरमधला तिचा अल्ट्रामॉडर्न लूक तिची भूमिका नेहमीपेक्षा वेगळी असल्याचं दर्शवतो.
या तिघींच्या भूमिकेबाबत समीर म्हणाला, ‘‘वायझेड’सारख्या पुरुष कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेल्या सिनेमात काम करण्यासाठी तयार झाल्याबद्दल मुक्ता आणि सईला मनापासून दाद द्यावीशी वाटते. त्या दोघींच्या भूमिकांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत त्यांना अशाप्रकारच्या भूमिकेत प्रेक्षकांनी कधीच पाहिलेलं नाही. मुक्ता किती चांगली अभिनेत्री आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे, पण मला त्याचबरोबर भूमिकेची खोली समजून घेण्याची तिची शैली कौतुकास्पद वाटते. बाकी तिच्या भूमिकेबद्दल अजून काही सांगता येणार नाही, कारण ते पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होत असलेल्या सिनेमाच्या ट्रेलरमध्येच उलगडेल. सईसोबत माझा हा तिसरा सिनेमा. सई नेहमीच स्वतःच्या ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर येऊन काम करायला प्राधान्य देणारी अभिनेत्री आहे. त्यामुळे ही भूमिका ऐकताक्षणी ती तयार झाली. ‘माझ्यापेक्षा वेगळ्या असलेल्या मुलीची विचारप्रक्रिया, तिचं वागणं जाणून घेऊन ती साकारायला गंमत येईल,’ असं सईचं म्हणणं होतं आणि त्याच उत्सुकतेमधून तिनं या भूमिकेसाठी अक्षरशः अंधारात उडी घेतली. पर्णबद्दल काय सांगायचं! ती तरुण आणि अतिशय गोड मुलगी आहे. प्रयोगशील रंगमंचावर तिनं खूप उत्तम काम केलं आहे.’
या तिघींच्याही भूमिका कशाप्रकारे सिनेमाचा महत्त्वाचा भाग आहेत हे विचारल्यावर समीर म्हणाला, ‘आजच्या मुलींना जाणवणारा प्रत्येक प्रश्न, मग तो स्वतःच्या अस्तित्व किंवा ओळखीचा असू देत नाहीतर नात्यांशी संबंधित असू देत. त्या ज्या प्रश्नांमुळे स्वतःशीच झगडत आहेत, त्यांची उत्तरं शोधण्यासाठी या तिघींच्या भूमिका प्रेरणा देतील. म्हणूनच आधी सांगितल्याप्रमाणे सिनेमात सागर- अक्षयच्या प्रमुख भूमिका असल्या, तरी मुक्ता, सई आणि पर्णच्या भूमिका खूप महत्त्वाच्या आहेत.’
१२ ऑगस्ट २०१६ या दिवशी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे संजय छाब्रिया आणि प्रतिसाद प्रॉडक्शनचे अनीष जोग केली असून पुढील आठवड्यात त्याचा पहिला ट्रेलर प्रदर्शित होत आहे. तोपर्यंत ‘वायझेड’च्या ‘फीमेल व्हर्जन’ची आणि बाकी एकंदरीतच वायझेडगिरीचा अनुभव घेण्याची उत्सुकता ताणून धरावी लागेल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mukta barve in yz movie

ताज्या बातम्या