‘युनिव्हर्सल मराठी’ सोबत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि सांस्कृतिक कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माय मुंबई’ लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष असून मुंबईच्या पु. ल.देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाटय़ मंदिरात हा महोत्सव १६ ते १८ डिसेंबरदरम्यान होणार आहे.
तीन दिवसीय असलेल्या या महोत्सवात लघुपटांच्या स्क्रीिनगसोबत वेगवेगळ्या विषयांवर चित्रपटसृष्टीतल्या मान्यवरांचे चर्चासत्र होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या महोत्सवासाठी लघुपट दिग्दर्शकांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.
या महोत्सवाचा यावर्षी विस्तार वाढविण्यात आला आहे. सामाजिक जनजागृती (सोशल अवेरनेस), आंतरराष्ट्रीय लघुपट (इंटरनॅशनल), अ‍ॅनिमेशनपट, मोबाइल शूट फिल्म, जाहिरातपट (अ‍ॅडफिल्म) या वर्गवारीसोबत संगीतपट (म्युझिक व्हिडीओ) आणि माहितीपट (डॉक्युमेंटरी) या दोन विभागांची वाढ करण्यात आली आहे. सर्व विभागांसाठी विनामूल्य ऑनलाइन प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक विजय पाटकर, अनंत पणशीकर, नीलकांती पाटेकर यांसारख्या दिग्गजांबरोबरच चित्रपटसृष्टीतल्या इतर अनेक मान्यवर तज्ज्ञांकडून लघुपटकारांना मार्गदर्शन मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांना विविध विषयांवर चर्चा आणि प्रश्नोत्तरांची संधी मिळणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेसहित सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.
या महोत्सवासाठी सर्वाना विनामूल्य प्रवेश असेल, पण त्यासाठी आधीच नावनोंदणी करून घेणे गरजेचे आहे. अशी माहिती युनिव्हर्सल मराठीचे सरचिटणीस अमितराज निर्मल यांनी दिली. अधिक माहितीसाठी ९७६८९३०८५३/ ९८३३०७५७०६ या क्रमांकांवर अथवा http://www.mymumbaishortfilmfestival.com या संकेतस्थळाद्वारे संपर्क साधावा.