सध्या सोनी वाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ पर्व ११ शो सर्वात जास्त चर्चेत आहे. मनोरंजनासोबतच माहितीचा स्त्रोत म्हणून याकडे विशेष पाहिले जाते. या शोच्या सूत्रसंचलनाची धूरा बॉलिवूडचे शेहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या खांद्यावर आहे. नुकताच अमिताभ यांनी शोमध्ये मी कोणत्याही धर्माशी संबंधित नाही असे वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य गांधी जयंती विशेष भागामध्ये केले आहे. दरम्यान त्यांनी त्यांचे खरे आडनाव बच्चन नाही असे देखील सांगितले आहे.
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये गांधी जयंती विशेष भागामध्ये बिंदेश्वर पाठक यांची स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली आहे. हॉटसीटवर ते बसले असताना अमिताभ यांनी ‘माझे आडनाव हे कोणत्या धर्माशी संबंधित नाही कारण माझ्या वडिलांचा धर्मावरुन होणाऱ्या भेदभावाला कायम विरोध होता. माझे खरे आडनाव श्रीवास्तव असे आहे पण आम्ही कधीच त्यावर विश्वास ठेवला नाही. बच्चन हे आडनाव लावणारा मी माझ्या घराण्यातील पहिला सदस्य आहे आणि त्याचा मला अभिमान आहे’ असे अमिताभ म्हणाले.
आणखी वाचा : …म्हणून केबीसीच्या हॉट सीटवर बसून पतीसोबत भांडू लागली स्पर्धक
दरम्यान अमिताभ यांनी आणखी एक किस्सा सांगितला आहे. ‘जेव्हा मी किंडरगार्टनमध्ये अॅडमिशन घेत होतो तेव्हा माझ्या वडिलांना माझे आडनाव विचारण्यात आले होते. त्यानंतर माझ्या वडिलांनी माझे आडनाव बच्चन लावण्याचा निर्णय घेतला. जनगणनेच्या वेळी कर्मचारी माझ्या घरी येतात आणि मला माझ्या धर्माबद्दल विचारतात तेव्हा मी कोणत्या विशिष्ट धर्माशी संबंधित नसून भारतीय असल्याचे सांगतो’ असे बिग बी पुढे म्हणाले आहेत.