अभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘नाम’ स्वयंसेवी संस्थेनं अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात २५ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, न्यायालयानं ‘नाम’विरोधात आरोप करण्यास मनाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

#MeToo चळवळीनं जोर धरल्यानंतर तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याचबरोबर तनुश्रीनं नाम फाऊंडेशनवरही काही आरोप केले होते. “नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या नावावर कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार केला. नाना पाटेकर यांनी नाम या संस्थेच्या नावाने परदेशातून कोट्यावधींच्या देणग्या घेतल्या. पण हा पैसा जातो कुठे? गरीब विधवांना वर्षातून एकदा साड्या वाटायच्या आणि फोटो काढायचं हे यांचं काम. ते कोल्हापूर पूरग्रस्तांना ५०० घरं देणार होते, त्याचं काय झालं? कोणी जाऊन बघितलं,” असं तनुश्री म्हणाली होती.

या आरोपानंतर ‘नाम’नं तनुश्रीविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. मात्र, या खटल्याच्या सुनावणीवेळी तनुश्री अनुपस्थित होती. तसेच, तिचे वकीलही वेळेवर न्यायालयात हजर राहिले नाहीत. याप्रकरणात न्यायमूर्ती ए.के. मेनन यांच्या खंठपीठासमोर सुनावणी सुरू आहे.

‘नाम’चं म्हणणं काय?

‘नाम’ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यात “नाम संस्था दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी निरंतर काम करत आहे. मात्र, जानेवारी २०२० मध्ये तनुश्री दत्ताने एका पत्रकार परिषदेत त्यांच्या संस्थेवर आरोप केले. त्यामुळे संस्थेच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे.”

विनयभंग प्रकरण?

२००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हॉर्न ओके प्लीज’ या हिंदी चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रिकरणावेळी नाना पाटेकर यांनी आपला विनयभंग केला होता, असा आरोप तनुश्रीनं केला होता. २०१८ मध्ये एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीनं पाटेकर यांच्यावर विनयभंगांचा आरोप केला होता. गेल्या वर्षी जूनमध्ये पोलिसांनी ही तक्रार खोटी असल्याचं सांगत प्रकरण बंद केलं होतं. मात्र, याविरोधात तनुश्रीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ही याचिका प्रलंबित आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naam files defemation case against tanushri datta bmh
First published on: 13-03-2020 at 09:01 IST