तात्यासाहेब शिरवाडकरांच्या अलौकिक प्रतिभेनं विस्तारलेलं मराठीतील अद्वितीय नाटक म्हणजेच ‘नटसम्राट’. आजही अनेकांना या नाटकाचे संवाद न संवाद पाठ आहेत. याच नाटकाच्या पुन:प्रत्ययाचा आनंद आता लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. मराठी रंगभूमीवर आपल्या कथाआशयाने अजरामर ठरलेले ‘नटसम्राट’ हे नाटक आता चित्रपटाच्या रूपातही आपल्यासमोर येत आहे. ‘कुणी घर देता का घर’ हे ‘नटसम्राट’ या नाटकातील अजरामर संवाद आता नाना पाटेकर यांच्या तोंडी ऐकायला मिळणार आहेत. अप्पासाहेब बेलवलकर ही अत्यंत गाजलेली व्यक्तिरेखा नाना पाटेकर साकारत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.
जबरदस्त संहिता, मर्मभेदी संवाद आणि अभिनयाची जुगलबंदी असलेल्या ‘नटसम्राट’ने मराठी नाटय़सृष्टीत एक अनोखी उंची गाठली आहे. डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट, यशवंत दत्त, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी अशा अनेक प्रतिभावान कलाकारांच्या अभिनयाची जादू या नाटकाद्वारे पाहावयास मिळाली होती. ‘नटसम्राट’ चित्रपटामुळे पुन्हा एकदा नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकरांच्या अभिनयाची जादू अनुभवता येणार आहे.
नाना पाटेकर यांव्यतिरीक्त रिमा लागू, विक्रम गोखले हे या चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये दिसतील. फिनक्राफ्ट मीडिया अॅण्ड एण्टरटेनमेंट प्रा. लि., गजानन चित्र आणि आणि ग्रेट मराठा एण्टरटेनमेंट प्रस्तुत विश्वास विनायक जोशी, नाना गजानन पाटेकर निर्मित आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट १ जानेवारी २०१६ रोजी प्रदर्शित होईल.
संग्रहित लेख, दिनांक 26th Oct 2015 रोजी प्रकाशित
पाहाः ‘नटसम्राट’च्या भूमिकेतील नाना पाटेकर
'कुणी घर देता का घर' हे 'नटसम्राट' या नाटकातील अजरामर संवाद नाना पाटेकर यांच्या तोंडी ऐकायला मिळणार आहेत.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 26-10-2015 at 11:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekar gears up for natsamrat dream project