उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध अजूनतरी सुधारलेले नाहीत. वारंवार होणारे दहशतवादी हल्ले आणि त्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेले ‘सर्जिकल स्ट्राईक’ या साऱ्याचा परिणाम फक्त राजकारणावरच झाला नाही, तर कला क्षेत्र आणि विशेषत: भारतीय चित्रपटसृष्टीवरही या घटनांचे तीव्र पडसाद उमटले. पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यावर बंदी घातल्यानंतर जेष्ठ लेखक सादत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारित ‘मंटो’ या चित्रपटासमोरही अडचणी आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फाळणीनंतर मुंबईतून लाहोरला गेलेले जेष्ठ लेखक सादत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटामध्ये अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे कथानक पाहता या चित्रपटातील काही भाग पाकिस्तानमधील लाहोर येथे चित्रीत होणार असल्याची चर्चा होती.

दरम्यान, पाकिस्तान आणि भारतादरम्यान असणारे तणावाचे वातावरण पाहता या चित्रपटाचे पाकिस्तानमधील चित्रीकरण रद्द करण्यात आले आहे. ‘जीवनाचा बराच काळ सादत हसन मंटो यांनी भारतात व्यतीत केला. पण, काही कारणास्तव त्यांना त्यांचे आवडते शहर म्हणजेच मुंबई सोडावी लागली होती. मंटो यांनी त्यांच्या जीवनातील अखेरची सात वर्षे लाहोरमध्ये व्यतीत केली. त्यामुळे या चित्रपटाला आणखी वास्तवदर्शी बनवण्यासाठी आम्ही या चित्रपटाचा काही भाग लाहोरमध्ये चित्रीत करण्याचे ठरवले होते. पण दोन्ही देशांमधील सद्यस्थिती पाहता या चित्रपटाचा जो भाग पाकिस्तानमध्ये चित्रीत होणार होता त्याचे चित्रीकरण आता भारतातच करावे लागू शकते. सध्या याबाबत आम्ही सर्वचजण विचार करत आहोत’, अशी प्रतिक्रिया नंदिता दासने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना दिली आहे.

भारत-पाकिस्तान या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या वादाचे परिणाम झालेल्या कलाकारांवर आता नंदिता दासच्या नावाचाही सहभाग झाला आहे. याआधी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटांवरही टांगती तलवार आली आहे. या चित्रपटांमध्ये माहिरा खान आणि फवाद खान या पाकिस्तानी कलाकारांच्या भूमिका असल्यामुळे सध्या त्याचा मोठ्या प्रमाणावर विरोध केला जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nandita das nawazuddin siddiqui starrer manto not to be shot in pakistan
First published on: 12-10-2016 at 18:24 IST