मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने दिग्दर्शित केलेला ‘बँजो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटाची प्रसिद्धी सध्या जोरात सुरु असून त्याकरिता अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री नर्गिस फाख्री कोणतीच कसर बाकी ठेवत नसल्याचे चित्र आहे. नुकतेच हे दोघेही चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता ‘डान्स प्लस’ या रिअॅलिटी शोच्या सेटवर गेले होते. तिथे असे काही झाले की नर्गिसवर तिच्या ड्रेसला पिन लावण्याची वेळ आली.
चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या नर्गिसने तिचे सौंदर्य खुलून येण्यासाठी सुंदर मोरपिसी रंगाचा पोशाख परिधान केला होता. मात्र, तिने घातलेला ड्रेस हा ‘रिव्हिलिंग’ असल्याचे डान्स प्लसच्या निर्मात्याचे म्हणणे होते. हा शो अनेक घरांमध्ये पाहिला जातो. लहानांपासून वृद्धांपर्यंत लोक हा शो पाहतात. त्यामुळे नर्गिसने सदर ड्रेस बदलून दुसरा ड्रेस घालावा असे निर्मात्यांचे म्हणणे होते. नाही तर शोमध्ये जाण्यापूर्वी निदान तिने ड्रेसला पिन तरी लावावा असे सांगण्यात आले. मात्र, एका संकेतस्थळाच्या वृत्तानुसार नर्गिसने दोन्ही गोष्टींना नकार दिला. तिच्या मते ड्रेस बदलावा असे त्यात काहीच वावगे नव्हते. पण जर नर्गिसने तसे केले नाही तर आपण शोचे चित्रीकरण करणार नसल्याचे दिग्दर्शकाने सांगितले. त्यामुळे नर्गिसकडे पर्यायाच राहिला नाही. शेवटी तिने ड्रेसला समोरच्या बाजूने पिन लावणे योग्य समजले.  त्यानंतर एपिसोडचे चित्रीकरण करण्यात आले. येत्या २३ सप्टेंबरला ‘बँजो’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.