दोन राष्ट्रीय पुरस्कारांसह तब्बल २० पुरस्कारांवार नाव कोरलेला ‘संहिता- द स्क्रिप्ट’ हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होतोय. तसेच, हा चित्रपट विविध सहा चित्रपट महोत्सवांमध्येही दाखविण्यात आला आहे. चाकोरी बाहेरचे विषय हाताळणा-या या चित्रपटाची निर्मिती सुभाष घई यांच्या मुक्ता आर्टस् लि.ने केली असून प्रस्तुती सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांची आहे.
‘संहिता- द स्क्रिप्ट’ चित्रपटाची कथा ही एका दिग्दर्शिकेची आहे. तसंच सांगायच तर ही कथा स्वतः त्या चित्रपट दिग्दर्शकेचीच आहे. देश स्वतंत्र होण्याच्या आधी ब्रिटीशकाळातील एका शाही संस्थानाच्या काळातील घटना चित्रपटात दाखविण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट एक राजा, राणी आणि राजगायक यांच्यावरील गोष्ट होऊन बसतो. यात प्रेम, दुरावा, अगतिकता आणि ध्यास याही ओघानेच येतात. या सगळ्या कथानकाची कल्पना करता-करता त्या चित्रपट दिग्दर्शिकेच्या खाजगी आयुष्यातल्या घटनांचेही बेमालूम मिश्रण त्यात होऊन जाते.
या चित्रपटातील ‘पलके ना मोडो’ या गीतासाठी साठाव्या राष्ट्रीय पुरस्कारांमधला सर्वोत्तम संगीताचा पुरस्कार शैलेंद्र बर्वे तर पार्श्वगायनाचा पुरस्कार आरती अंकलीकर यांनी पटाकाविला आहे. देविका दफ्तरदार, मिलिंद सोमण, राजेश्वरी सचदेव, उत्तरा बावकर, ज्योती सुभाष, डॉ.शरद भुताडिया, डॉ.शेखर कुलकर्णी, सारंग साठ्ये, नेहा महाजन यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.