आयुष्मान आणि विकी कौशल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार
नवी दिल्ली : गुजराती भाषेतील ‘हेल्लारो’ हा २०१८मधील देशातील सर्वोत्तम चित्रपट ठरला असून या चित्रपटाला शुक्रवारी ‘सुवर्ण कमळ’ जाहीर झाले.
आयुष्मान खुराना (अंधाधुन) आणि विकी कौशल (उरी) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून तर ‘महानटी’ या तामीळ चित्रपटासाठी कीर्ती सुरेश सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. ‘उरी’साठी आदित्य धर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले आहेत.
२०१८ सालच्या या पुरस्कारांची घोषणा लोकसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडली होती. देशातील विविध भाषांमधील उत्कृष्ट चित्रपटांचा सन्मान करणाऱ्या या पुरस्कारांचे हे ६६ वे वर्ष आहे.
कच्छमधील लोककथेचा आधार घेत महिला सशक्तीकरणाचे सूत्र मांडणारा ‘हेल्लारो’ हा अभिषेक शहा या तरुण दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट आहे.
प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘अंधाधुन’ हा हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि तब्बू यांच्या भूमिका आहेत. ‘बधाई हो’ हा सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट ठरला आहे. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘पॅडमॅन’ची निवड करण्यात आली.
अन्य राष्ट्रीय पुरस्कार
नृत्य दिग्दर्शक- कृती महेश मिद्या, ज्योती तोमर (पद्मावत), संगीत दिग्दर्शक- संजयलीला भन्साळी (पद्मावत), पाश्र्वगायक- अरिजीत सिंग (पद्मावत- बिंते दिल), सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो), पटकथा- अंधाधुन, वेशभूषा- महानटी, ध्वनीसंरचना – उरी, संवाद – तारीख (बंगाली).
अन्य भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट : उर्दू- हमीद, तामीळ- बारम
राजस्थानी- टर्ट्ल, तेलुगु- महानटी, आसामी- बुलबुल कॅन सिंग, पंजाबी- हारजीत, बंगाली- एक जे छीलो राजा, गारो- मामा, कन्नड- नतीचरामी, कोंकणी- अमोरी, गुजराती- रेवा.
श्रीनिवास पोकळे सर्वोत्कृष्ट बालकलाकार, स्वानंद किरकिरे सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता
‘भोंगा’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. ‘नाळ’ या चित्रपटाला दोन पुरस्कार मिळाले असून सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार श्रीनिवास पोकळे याला तर, पदार्पणात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा इंदिरा गांधी पुरस्कार सुधाकर रेड्डी यांना मिळाला आहे. ‘भोंगा’ची निर्मिती आणि दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांचे आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून ख्याती लाभलेले स्वानंद किरकिरे यांना ‘चुंबक’मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ‘तेंडल्या’ला सर्वोत्कृष्ट साऊंड लोकेशन रेकॉर्डिगचा, ‘पाणी’ला सर्वोत्कृष्ट पर्यावरणपटाचा तर ‘खरवस’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘धग’ या चित्रपटानंतर मला हा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार ‘भोंगा’ या चित्रपटासाठी मिळाला आहे. हा विषय घेऊन जेव्हा अनेक निर्मात्यांना भेटलो तेव्हा त्यांना यात रस वाटला नाही. त्यांचे ऐकून आज जर मी हा चित्रपट बाजूला ठेवला असता तर इतका चांगला विषय लोकांपर्यंत पोहोचवू शकलो नसतो.
– शिवाजी लोटन पाटील, दिग्दर्शक – भोंगा
‘नाळ’ हा दिग्दर्शक म्हणून माझा पहिलाच चित्रपट होता. ही गोष्ट लिहिताना त्यात खूप सूक्ष्म, संयत भावभावना आहेत याची जाणीव मला होती. त्यामुळे पडद्यावर त्या भावभावना अचूकपणे व्यक्त करणारे त्याच ताकदीचे कलाकार हवे होते. यात मला नागराजची खूप मदत झाली. नशिबाने मला श्रीनिवाससारखा बालकलाकार मिळाला.
– सुधाकर रेड्डी यंकट्टी, दिग्दर्शक – नाळ