‘हौस माझी पुरवा’

रवींद्र पाथरे

शाहीर साबळेंनी तत्कालीन सामाजिक, राजकीय प्रश्नांवर ‘आंधळं दळतंय’, ‘कशी काय वाट चुकलात’ यांसारखी अनेक धमाल मुक्तनाटय़ं सादर करून मनोरंजनाबरोबरच सामाजिक जागृतीचंही काम केलं. त्यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’मधील त्यांचे एक शिष्योत्तम संतोष पवार यांनी त्यांचा लोककलेचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेला. संतोष पवारांची बरीचशी नाटकं लोककला आणि लोकसंगीताच्या आश्रयानं फुलली, बहरली. किंबहुना, रंगभूमीच्या मध्यंतरीच्या वाईट दिवसांत त्यांच्या नाटकांनी रंगभूमी तगली, हे वास्तव आहे. संख्येनं विपुल आणि धंद्याची किमान हमी हे त्यांच्या नाटकांचे विशेष. म्हणूनच बरेच जण आले-गेले, पण गेली पंचवीसेक वर्षे ते रंगभूमीवर ठामपणे उभे आहेत. लेखक-दिग्दर्शक तर ते आहेतच; पण त्यांच्यातल्या हरहुन्नरी अभिनेत्याला  (खरं तर सोंगाडय़ाला!) काही वेळा मागे ठेवून ते सतत नाटकं करीत राहिले. आपल्या मर्यादांची त्यांना जाणीव आहे; त्याचबरोबर आपल्या बलस्थानांचीसुद्धा! म्हणूनच बहुधा ते कधी उतले नाहीत की कधी मातलेही नाहीत.

अलीकडेच रंगभूमीवर आलेलं त्यांचं नवं नाटक ‘हौस माझी पुरवा’ हे सद्य: राजकीय परिस्थितीवरचं रंजनाच्या अवगुंठनातलं एक धमाल नाटक आहे. लोकशाहीच्या पुरस्कर्त्यां एका राज्यात राज्यात संतू आणि अंशू हे दोन रिकामटेकडे मित्र राजाला राजगादीवरून खाली खेचून स्वत: सिंहासनावर बसायची स्वप्नं पाहत असतात. पण त्यासाठी मुळात राजाला सिंहासनावरून खाली खेचायला हवं. पण ते कसं करायचं?

संतू डोकॅलिटी वापरून राज्यात डान्स बार काढण्याची शक्कल अंशूला सुचवतो. राजाला त्यासाठी राजी करून डान्स बारची परवानगी मिळवायची आणि डान्स बारमध्ये आपली प्रेयसी सोनू हिला बारबाला म्हणून ठेवायचं. तदनंतर राजाच्या डान्स बारच्या निर्णयावरून जनतेच्या मनात विष कालवून त्यांना भडकवायचं.. बस्स! मग झालंच आपलं काम फत्ते!

पण राजा काही केल्या डान्स बारला परवानगी द्यायला तयार होत नाही. तेव्हा राणीसाहेबांना घोळात घेऊन ती मिळवली जाते. तथापि राजा फतवा काढतो की, डान्स बारमध्ये फक्त सात्विक गाणीच सादर करता येतील. डान्स बारमध्ये आणि सात्विक गाणी? भलतंच काय? पण राजाला उल्लू बनवता येईल अशी संतू-अंशूची कल्पना असते. मात्र, राजा स्वत: डान्स बारची पाहणी करण्यासाठी बाहेर पडतो आणि या दुकलीचं बिंग बाहेर येतं. त्यांचा बेत फसतो.

पण गप्प बसतील तर अंशू-संतू कसले? ही दुक्कल मग राजाला गोत्यात आणण्यासाठी नाना क्लृप्त्या योजते. पण व्यर्थ! राजा वरपांगी जरी बावळट, भोळसट वाटला तरी या दोघांची करणी तो चांगलीच ओळखून असतो. त्यामुळे प्रत्येक वेळी तो त्यांच्याच तंगडय़ा त्यांच्या गळ्यात बांधतो. शेवटी दोघं धर्मामध्ये वितुष्ट निर्माण करणारा निर्णय घ्यायला राजाला भाग पाडतात. परंतु राजा शेरास सव्वाशेर निघतो. त्याबद्दलचा फतवाही या दुकलीच्याच अंगाशी येईल अशी व्यवस्था तो करतो. यांच्या लेखी बावळट्ट असलेला राजा प्रत्यक्षात मात्र भलताच हुश्शार निघतो. या दुकलीच्या प्रत्येक चाली तो प्रतिडाव टाकून परतवून लावतो. शेवटी ते राजासमोर हात टेकतात. राज्याचे कारभारी होण्याचे त्यांचे मनसुबे धुळीस मिळतात.

लेखक-दिग्दर्शक संतोष पवार यांनी आज आपल्या सभोवताली चाललेला लोकशाहीचा तमाशा उपहासात्मक स्वरूपात ‘हौस माझी पुरवा’मध्ये पेश केला आहे. टिपिकल वगनाटय़ाच्या अंगाने न जाता मुक्तनाटय़ स्वरूपात त्यांनी तो पेश केला आहे. त्याला लोकप्रिय गाण्यांची चपखल फोडणी देणं हा तर त्यांच्या डाव्या हातचा मळ. अधेमधे राजकीय मल्लिनाथी करत, हसत, हसवत हा खेळ त्यांनी मांडला आहे. विनोदाची उत्तम जाण असलेल्या अंशुमन विचारे या नटाला सोबत घेतल्याने या मुक्तनाटय़ाची खुमारी वाढली आहे. संतोष पवारांचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे बिनचेहऱ्याच्या कलाकारांना विविध भूमिकांत पेश करण्याचं त्यांचं अफलातून कसब. म्हटलं तर ही नट मंडळी (चिकणाचुपडा चेहरा नसल्याने) ‘कलावंत’ म्हणून प्रेक्षकांच्या व्याख्येत तशी न बसणारी. परंतु संतोष पवार यांची खासीयत ही की, अशा नटांकडून ते भन्नाट कामं करवून घेतात. त्यांच्यातल्या शारीर कमतरतांवर मात करत ही नट मंडळी असं काही गारूड निर्माण करतात, की प्रेक्षकांची मनं ते जिंकतात. आजवर कुठल्याच दिग्दर्शकाला हे जमलेलं नाही. मनोरंजन क्षेत्रात संतोष पवारांच्या नाटकांतून पुढे आलेली अशा कलाकारांची एक फौजच्या फौज सध्या छोटा पडदा आणि रंगभूमी व्यापून आहे.. तर ते असो.

‘हौस माझी पुरवा’मध्ये संतोष पवार यांनी सर्वच आघाडय़ांवर धूमशान घातलं आहे. लेखक, दिग्दर्शक ,अभिनेते आणि नेपथ्यकार या नात्याने त्यांनी स्वत:च चौफेर कामगिरी बजावली आहे. नाटकाची कथा संकल्पना अजय विचारे यांची आहे. लोकशाहीचा जो तमाशा सध्या केंद्र आणि राज्य स्तरावर आपण पाहतो, अनुभवतो आहोत, त्याचा समाचार या नाटकात घेतलेला आहे. राजकारणाची अत्यंत घसरलेली पातळी, माकडचाळे करणारे राजकारणी, विरोधकांमागे ईडीफिडी लावून त्यांना पळता भुई थोडी करण्याचा रडीचा डाव, आपण स्वत: राज्यकर्ते म्हणून सर्वच आघाडय़ांवर सपशेल फेल झालेले असताना त्याकडे लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून उन्मादी धर्माधता आणि कथित राष्ट्रवादाचा आधार घेत सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचे होत असलेले प्रयत्न, घराणेशाही, भ्रष्टाचार वगैरे हुकमी ‘कार्ड्स’चा सोयीस्कर गैरवापर ही वर्तमान वस्तुस्थिती आहे. या सगळ्यावर संतोष पवार नाटकात जाता जाता बोचऱ्या, उपहासगर्भ कमेन्ट्स करतात. फक्त प्रॉब्लेम हा आहे, की प्रेक्षकही त्या तितक्याच हलक्यात घेतात. खरं तर त्यातील अन्वयार्थ त्यांच्यापर्यंत पोहचायला हवा; पण तसा तो पोचत नाही. संतोष पवारांचा स्वत:चाच दृष्टिकोन रंजनात्मक असल्याने असं घडत असावं का? तसंही असेल. असो.

नाटकाच्या तांत्रिक बाजू यथातथ्य.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संतोष पवार संतूच्या भूमिकेत प्रसंगपरत्वे कळीचे मुद्दे उपस्थित करून नाटक सतत हलतं बोलतं राहील याची दक्षता घेतात. अंशुमन विचारे (अंशू) यांनीही त्यांना त्यात तोलामोलाची साथ केली आहे. राजा झालेले अमोल सूर्यवंशी ‘वेश बावळा, परी अंगी नाना कळा’ या उक्तीप्रमाणे वरकरणी कसलीही पोझ न घेता जे करायचंय ते उत्तमरीत्या व्यक्त करतात. प्राप्ती बने यांची राणीही उछलकुदमध्ये कमी पडत नाही. हर्षदा बामणे यांनी संतूची प्रेयसी सोनू साकारली आहे. टाईमपास आणि जमलंच तर बोधामृत प्राशन करण्याची हौस भागविण्यासाठी हे नाटक पाहायला हरकत नाही.