प्रत्येक यशस्वी कलाकारामागे एक संघर्षाचा काळ असतो. हाच संघर्षाचा काळ त्याला बऱ्याच गोष्टींची शिकवून जातो. हार न मानता कठोर मेहनत करत पुढे गेल्यास यशाची गोडी निश्चितच चाखायला मिळते. असंच काही अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत घडलंय. ‘मंटो’, ‘मांझी’ आणि आता ‘ठाकरे’ अशा दमदार भूमिका साकारणाऱ्या नवाजुद्दीनच्या आयुष्यातही संघर्षाचे बरेच क्षण आले. अनेकदा अपमानालाही सामोरं जावं लागलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनला तुझ्या आयुष्यातील सर्वांत अपमानास्पद क्षण कोणता असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने सांगितलं, ‘तू एखाद्या हिरोसारखा दिसत नाही असं अनेकांनी मला माझ्या स्ट्रगलिंगच्या काळात हिणवलं. जिथे काम मागण्यासाठी गेलो तिथे त्यांनी माझ्या दिसण्यावरून अभिनय कौशल्याचं मूल्यमापन केलं. हेच सर्वांत अपमानास्पद होतं.’ जवळपास १२ वर्षांच्या स्ट्रगलनंतर माझ्या अभिनय कौशल्याला ओळख मिळाली असंही नवाजुद्दीन या मुलाखतीत सांगितलं. त्याचप्रमाणे गेल्या ३० वर्षांपासून आपण फक्त अभिनय आणि त्याच्याशीच संबंधित गोष्टींवर लक्ष केंद्रीत केल्याचं तो म्हणतो. ‘बाहेरच्या जगात काय चालू आहे, यात मला फार रस नाही. माझ्या मित्रांसोबतही मी फक्त चित्रपट आणि अभिनय यांच्याशी संबंधित गप्पा मारतो आणि माझ्यासाठी अभिनयच महत्त्वाचं आहे,’ असं तो पुढे म्हणाला.

आगामी ‘ठाकरे’ या चित्रपटात नवाजुद्दीन बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारत आहे. येत्या २५ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui talking about his most humiliated experience of life
First published on: 16-01-2019 at 18:29 IST