एका सामान्य व्यक्तीपासून ते सेलिब्रिटीपर्यंत, नवाजुद्दीन सिद्दीकीने आपली मेहनत आणि अभिनयाच्या अनोख्या शैलीने बॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. सेलिब्रिटी झाल्यानंतरही नवाजुद्दीनने आपलं साधारण व्यक्तिमत्त्व आणि समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची जिद्द सोडलेली नाही. आपण नेहमी काय योग्य आणि काय अयोग्य आहे हेच आपल्या मुलांना शिकवतो मात्र चांगला समाज उभा करण्यामध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे हे मुलांना शिकवणे आपण विसरले नाही पाहिजे, असं नवाजुद्दीनचे मत आहे. यामुळेच दर रविवारी वर्सोवा बीच स्वच्छतेच्या कार्यक्रमात नवाजुद्दीनची दोन्ही मुले शोरा आणि यानी आवर्जून सहभागी असतात.
चिमुकल्या शोरा आणि यानीच्या या उल्लेखनीय कामाचे कौतुक त्यांचे काका शामस सिद्दीकी यांनी ट्विटरवर केले आहे. त्याचप्रमाणे लोकांनाही या स्वच्छतेच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी या ट्विटरमधून केले आहे.
https://twitter.com/ShamasSiddiqui/status/871673455481147392
वाचा : अलका कुबल- आठल्येंच्या मुलीची गगन भरारी
दर रविवारी वर्सोवा बीचवर वकील अफरोझ शाह यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात येते. मागील रविवारी या बीचवरील १६० टन कचरा साफ करण्यात आला असून, ५०० झाडेसुद्धा लावण्यात आली. या स्वच्छता अभियानात एकूण दोन हजार स्वयंसेवक सहभागी असून त्यामध्ये नवाजुद्दीनच्या या दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. स्वच्छतेसारख्या महत्त्वाच्या कामात हातभार लावून नवाजुद्दीनच्या मुलांनी समाजात एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. त्याचप्रमाणे या कामात सहभागी होण्यासाठी इतरांना प्रोत्साहितसुद्धा केले आहे.