मराठी मालिका किंवा चित्रपट क्षेत्रातून हिंदीमध्ये गेलेल्या आणि नंतर कधी मागे वळून न पाहिलेल्या कलाकारांची संख्या काही कमी नाही. एकदा हिंदीमध्ये जम बसल्यावर चांगल्या भूमिका मिळत नाहीत, वेळ नाही या आणि अशा अनेक सबबी काढून मराठीकडे पाठ फिरवण्याचा त्यांचा प्रघात असतो. असे असतानाही स्वत: अमराठी असूनही मराठीतही आवर्जून हजेरी लावणारे कलाकारही आहेत. सुमित राघवन यातील एक ठळक नाव.
दूरदर्शनवरील ‘फास्टर फेणे’मधून बालकलाकार म्हणून काम केलेल्या सुमितने मराठी रंगभूमीवरही आपला ठसा उमटवला होता. नंतर मात्र त्याने त्याचा मोहरा हिंदी मालिकांकडे वळवला. मध्यंतरी मराठी ‘सारेगमपा’मधून त्याने आपल्या गात्या गळ्याची चुणूक दाखवली होती. त्यानंतर तो मराठीत छोटय़ा पडद्यापासून दूरच राहिला. लवकरच सब टिव्हीवरील ‘बडी दूर से आये है’ या विनोदी मालिकेत तो परग्रहावरून पृथ्वीवर आलेल्या माणसाची भूमिका करत आहे. परग्रहावर राहणाऱ्या एका कुटुंबातील लहान मुलगा चुकून पृथ्वीवर येतो आणि त्या मुलाला
शोधण्यासाठी त्याचे संपूर्ण कुटूंब पृथ्वीवर दाखल होते. पृथ्वीवरील माणसांशी जुळवून घेताना त्या कुटुंबाला कोणकोणत्या प्रसंगातून जावे लागते यावर ही मालिका आधारित आहे.
या मालिकेच्या निमित्ताने सुमितला मराठी मालिकांमध्ये परतावेसे का नाही वाटत, असे विचारले असता, मला मराठीत मालिका करावीशी नाही वाटली याचं स्पष्ट कारण द्यायचं झालं तर इथे पैसे कमी मिळतात. आणि दुसरं म्हणजे मराठी असो किंवा हिंदी दैनंदिन मालिकांमध्ये स्त्री व्यक्तीरेखेला महत्त्व असतं. पुरुषांच्या व्यक्तीरेखेला तितकेसे वजन नसते. त्यामुळे भूमिकाही चांगली आहे आणि पैसेही चांगले मिळताहेत अशी सांगड घातली गेली पाहिजे. मराठीतीत ती दिसत नाही, असे रोखठोक उत्तर सुमितने दिले.
अर्थात मराठीतही चांगल्या विनोदी मालिकांची कमतरता नाही हे सुमितला मान्य आहे. ‘मराठीमध्ये कॉमेडीच्या स्पर्धामधील कलाकार खूप छान काम करतात. पण सध्यातरी या स्पर्धामध्ये पडावसं मला वाटत नाही. मराठीतच काय, हिंदीतही या स्पर्धामध्ये भाग घ्यावा असं मला कधीच वाटलं नाही, असे सुमितचे म्हणणे आहे.