scorecardresearch

‘सत्यशोधक’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या ३ वर्षा पासून ‘सत्यशोधक’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या निर्मितीसाठी सर्व टीम अथक परिश्रम घेत आहे.

‘सत्यशोधक’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंधश्रद्धेच्या अंधःकारात खितपत पडलेल्या समाजाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे काम महात्मा जोतिबा फुले यांनी केले. आपल्या प्रखर लेखणीच्या व कार्याच्या जोरावर जन-माणसात नवीन विचार पेरणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांनी शोषण कर्त्यांच्या विरोधात बंड पुकारलं. दुष्ट रुढी परंपरांच्या गर्तेत अडकलेल्या समाजाला मानवतेचा आणि सत्याचा मार्ग दाखवून महात्मा जोतिबा फुले खऱ्या अर्थाने सत्य धर्माचे पथदर्शक ठरले. या अशाच अनिष्ट प्रथांच्या विरोधात सत्याचा शोध घेणारा आणि समानतेच्या वाटेवर चालणाऱ्या सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली.

अशा क्रांतिकारी महात्मा जोतिबा फुले यांचा जीवन प्रवास मोठ्या पडद्यावर हिंदी आणि मराठी चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहे. समता फिल्म्स आणि पी बी इन्फ्रा यांच्या संयुक्त बॅनर अंतर्गत चित्रपट तयार होत आहे. गेल्या ३ वर्षांपासून ‘सत्यशोधक’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या निर्मितीसाठी सर्व टीम अथक परिश्रम घेत आहे.

चित्रपटामध्ये महात्मा जोतिबा फुलेंच्या भूमिकेत संदीप कुळकर्णी, तर राजश्री देशपांडे सावित्रीबाईंची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचे ८० टक्के चित्रीकरण पूर्ण झाले असून, उर्वरीत चित्रीकरण येत्या मे महिन्यात करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेत प्रदर्शीत होणार आहे. १९व्या शतकाची सुरवात आणि तो काळ पडद्यावर साकारण्यासाठी भव्य सेट उभारण्यात आले असून, वी.एफ.एक्सच्या आधुनिक तंत्राचा देखील वापर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-04-2021 at 19:04 IST

संबंधित बातम्या