१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला. तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने पुलवामा जिल्ह्य़ात आत्मघातकी हल्ला केला होता. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले आहेत. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यासोबत अनेकांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सलमान खानच्या आगामी ‘नोटबुक’ या चित्रपटाचे निर्मातेही शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २२ लाख रुपये देणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सलमान खाननिर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटाचं अर्ध्याहून अधिक चित्रीकरण काश्मीरमध्ये झालं आहे. चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असताना येथे तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांनी कायम आमचं संरक्षण केलं. त्यामुळे आम्ही निर्धास्तपणे आमचं चित्रीकरण पूर्ण करु शकलो. आज आपलं संरक्षण करणारे हेच जवान आपल्यासाठी शहीद झाले आहेत. त्यामुळे आता आपण त्यांच्या कुटुंबीयांसाठी काही तरी करण्याची वेळ आली आहे. यासाठीच आम्ही हा मदतनिधी त्यांच्या कुटुंबीयांना देण्याचं ठरवलं आहे’, असं निर्मात्यांनी सांगितलं.

दरम्यान, आतापर्यंत अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यासारख्या अनेक कलाकारांनी शहिदांच्या कुटुंबीयांना मदत केली आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळी असून अनेक संघटनांनी पाकिस्तानी गायक, कलाकार यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे अभिनेता सलमान खान यानेदेखील त्याच्या ‘नोटबुक’ चित्रपटातून आतिफ अस्लम याने गायलेलं गाणं हटवण्याच्या सूचना प्रोडक्शन हाऊसला दिल्या आहेत.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notebook producer to give 22 lakh to families of pulwama attack martyrs
First published on: 19-02-2019 at 14:14 IST