विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाला दर दिवसाआड एक नवे वळण मिळते आहे. कपिल शर्माने कशाचीही तमा न बाळगता विमानप्रवासादरम्यान सुनील ग्रोवरचा अपमान केला होता. त्यासोबतच त्याला शिवीगाळ करत कपिल त्याच्या अंगावर धावून गेल्याचेही म्हटले जात होते. कपिलच्या या अशा वागण्यानंतर सुनील ग्रोवर, अली असगर आणि चंदन प्रभाकर या तिन्ही कलाकारांनी त्याच्या कार्यक्रमात न परतण्याचा निर्णय घेतल्यामुळे कपिलसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिल्याचे दिसते आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये मुख्य सूत्रसंचालकाच्या भूमिकेत जरी कपिल झळकत असला तरीही सुनील ग्रोवर, अली असगर आणि चंदन प्रभाकर या कलाकारांच्या विनोदी फटकेबाजीमुळेही या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या प्रमाणात टीआरपी मिळत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘द कपिल शर्मा शो’चे काही भाग नुकतेच प्रदर्शित झाले. पण त्यामध्ये सुनील ग्रोवर आणि अली असगरचा मात्र सहभाग नव्हता. या कलाकारांच्या अनुपस्थितीमुळे टेलिव्हिजनसमोरील प्रेक्षकांनी तर नाकं मुरडलीच पण सोशल मीडियावरही कपिलच्या शोचे हे व्हिडिओ अनलाइक करणाऱ्यांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. व्हिडिओ लाइक करणाऱ्यांच्या तुलनेत जवळपास तीन पट जास्त लोकांनी व्हिडिओ अनलाइक केला आहे. कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमध्ये अचानक झालेला हा बदल आणि प्रेक्षकांची कार्यक्रमाप्रती कमी झालेली निष्ठा पाहता कपिलला त्याचे हे वागणे चांगलेच अंगलट आल्याचे दिसतेय.

‘द कपिल शर्मा शो’च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका भागामध्ये ‘नाम शबाना’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता मनोज बाजपेयी यांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. त्यांची उपस्थिती असलेला हा व्हिडिओ युट्यूबवर पोस्ट केल्यानंतर जवळपास १५ लाख लोकांनी तो पाहिला. पण, त्यानंतर व्हिडिओच्या अनलाइक्सचा आकडा झपाट्याने वाढल्याचे पाहायला मिळाले. अर्थात कपिलसाठीही हे सारे काही अनपेक्षितच असणार. कपिलचे शो युट्यूबवर पाहणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या या गर्दीत तो पसंत करणाऱ्यांपेक्षा नापसंत करणाऱ्यांचीच संख्या जास्त असल्याची ही पहिलीच वेळ आहे. कपिल शर्मा त्याच्या उद्दाम वागण्यामुळे चांगलाच वादात अडकला आहे. इतकेच काय तर ‘नाम शबाना’ची टीम त्याच्या कार्यक्रमात आली असतानाच होत्याचे नव्हते झालेली ही परिस्थिती पाहता कपिलला त्याचे अश्रू अनावर झाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One more bad news for kapil sharma number on dislikes rises on shows you tube episodes
First published on: 27-03-2017 at 16:35 IST