चुरशीचा असला तरी दरवर्षी ऑस्करचा मुख्य दावेदार चित्रपट बऱ्याच आधी ठरलेला असतो. सर्व मानाच्या पुरस्कारांवर बाजी मारत तीनेक महिने आधीच सवरेत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी बनण्याची तयारी विशिष्ट चित्रपटाची झालेली असते. उद्या होणाऱ्या पुरस्कारात मात्र तसे चित्र नाही..
गेल्या वर्षी ऑस्करच्या नामांकनाच्या घोळामुळे चित्रपटांचे पुरस्कार विचित्र पद्धतीने विभागले गेले आणि तुलनेने पुरस्कारयोग्य नसलेल्या ‘लाईफ ऑफ पाय’च्या गळ्यात मानाची सवरेत्कृष्ट चित्रपटाची माळ पडली. यंदाही पुरस्कारांची विभागणी होण्याची शक्यता आहे. मात्र नामांकन घोळाऐवजी गुणवत्ता त्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. केवळ अंतराळाचा पैसा वसूल थ्रीडी थरार या एका निकषावर ग्रॅव्हिटी मागे पडू शकतो.  गुलामगिरी आणि कृष्णवर्णीय शोषणाचा विषय ऑस्करसाठी नवा नसल्यामुळे  ‘ट्वेल इयर ए स्लेव्ह’  मागे पडू शकतो. माणूस आणि संगणक यांच्या प्रेमाची कथा मांडत मानवी नातेसंबंधांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ‘हर’ बाजी मारू शकतो, तसाच मार्टिन स्कॉर्सेसी या दिग्दर्शकीय बलामुळे ‘वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ही पुढे येऊ शकतो. या स्पर्धेतील सर्वात लंगडे घोडे ‘नेब्रास्का’ आणि ‘फिलोमिना’ असले तरी  भरगच्च जीवनानुभव देणारे आहेत.
‘ट्वेल इयर ए स्लेव्ह’  
१८४०-५० च्या दशकामध्ये अमेरिकेतील कृष्णवर्णीय गुलामांची परिस्थिती कशी होती, गुलामांचा व्यापार कसा चालत होता आणि मुक्त कृष्णवंशीयांबाबत श्वेतवर्णीयांची काय भावना होती याचा कथारुपी इतिहास एका व्यक्तीच्या कथेतून मांडण्यात आला आहे. सत्य घटनांवर आधारित असलेल्या या चित्रपटातील डोळ्यांना आणि मनाला सहज न झेपू शकणारी अत्याचार दृश्ये मानवी क्रौर्याचा कळस दाखवितात. सवरेत्कृष्ट चित्रपटासह ९ नामांकने असलेल्या या चित्रपटाला अभिनेता किंवा सवरेत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक यांपैकी कोणता पुरस्कार मिळेल याबाबत कुतूहल आहे.
ग्रॅव्हिटी
अंतराळ यानात अचानक स्फोट झाल्यामुळे अडकलेल्या आणि उपलब्ध जीवसाधनांमधून स्वत:ला वाचविण्यासाठी लढणाऱ्या महिला अंतराळ यात्रिकाची कथा असलेल्या या चित्रपटाला १० मानांकने मिळाली आहेत. त्यातील व्हिज्युअल इफेक्ट्स सोबत अभिनेत्रीसाठीचा सवरेत्कृष्ट पुरस्कार सॅण्ड्रा बुलकला मिळेल याची खात्री असली, तरी इतर पुरस्कारांमध्ये त्याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे.
अमेरिकन हसल
१९७० च्या दशकातील अमेरिकी भ्रष्टाचार उघडकीची एफबीआयची विचित्र कामगिरी या चित्रपटात आहे. निष्णात चोरांना हाताशी धरून एफबीआयचा अधिकारी भ्रष्टाचारांची पाळेमुळे कशी खणतो, त्याची आकर्षक आणि रंजक कथेद्वारे मांडणी करण्यात आली आहे. महत्त्वाच्या पुरस्कारांसह चारही अभिनयासाठी (सवरेत्कृष्ट आणि सहायक अभिनेता/अभिनेत्री) हा चित्रपट ऑस्कर शर्यतीत आहे. या चित्रपटाची सहायक अभिनेता आणि अभिनेत्रीचा पुरस्कार हमखास असला, तरी बाकीच्या पुरस्कारांचे चित्र सोमवारीच स्पष्ट होईल.
इतर चित्रपट
जॉर्डन बेलफर्ट या भ्रष्ट स्टॉकब्रोकरची सुरस आणि चमत्कारिक कथा मांडणारा ‘वुल्फ ऑफ वॉलस्ट्रीट’ हा दीर्घचित्रपट शर्यतीत असला, तरी तगडय़ा स्पर्धकांपुढे त्याला यश मिळते का, याचा अंदाज करता येणे कठीण आहे. लिओनाडरे डी कॅपरिओला ऑस्कर मिळण्याची शक्यता डलास बायर्स क्लबमधील मॅथ्यू मॅकनॉईच्या अभिनयाने कमी करून ठेवली आहे. महायुद्धोत्तर काळात आर्यलडमधील मिशनरींमधून अमेरिकेत  दत्तक देण्याच्या नावाखाली मुलांची विक्री करण्याची कथा एका शोधातून दाखविणाऱ्या ‘फिलोमिना’ची भावस्पर्शी कथा पुरस्कार पटकावण्याची शक्यता कमी आहे. एका वृद्धाची फिलोमिनाइतकीच भावस्पर्शी कहाणी मांडणारा नेब्रास्का आणि सोमालिया चाच्यांकडून सुटकेची कथा मांडणारा कॅप्टन फिलिप्स स्पर्धेतील शेवटच्या रांगेचे खेळाडू आहेत.
हर
माणूस व संगणक यांच्यातील प्रेमसंबंधाद्वारे मानवी आयुष्याचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या हर चित्रपटाने बऱ्याच महत्त्वाच्या पुरस्कारांवर नाव कोरत ऑस्करची आशा निर्माण केली आहे. सध्या माणसाची यंत्रसोबत इतकी वाढत चालली आहे की खऱ्या नातेसंबंधांहून अधिक आभासी नात्यांना महत्व आले आहे. या आभासी नात्यांच्याही विश्वासार्हतेला तडा देणारे प्रश्न हा चित्रपट निर्माण करीत असल्यामुळे हा चित्रपट यंदाच्या चित्रटातील सर्वाधिक कालसुसंगत आहे.