करोनाकाळातील निर्बंधांचे आव्हान पार करून पुन्हा व्यवसायाची गणितं सावरण्यासाठी धडपडत असलेल्या हिंदी चित्रपटांना अजूनही चित्रपटगृहातून यश मिळवणं अवघड जात आहे. एकीकडे प्रादेशिक चित्रपटांना चांगले यश मिळत असले तरी हिंदीतील मोठय़ा चित्रपटांना हवं तसं यश मिळत नाही आहे. त्यामुळे चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यावर कमीतकमी आठ आठवडय़ांनंतर ओटीटी वा सॅटेलाइट प्रदर्शनासाठी धडपडणारे चित्रपट लगोलग प्रेक्षकांना घरात बसून पाहता येऊ लागले आहेत. गेल्या महिन्याभरात किंबहुना गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेले बिग बजेट चित्रपट लवकरच ओटीटी माध्यमावर येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

निर्बंधकाळात चित्रपटगृहे बंद असल्याने अनेक हिंदी चित्रपट ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित झाले. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो लवकरच ओटीटी माध्यमावर पाहायला मिळणार याची खात्री असल्याने प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याला प्राधान्य देत नाहीत, अशी चर्चा गेले काही महिने चित्रपट व्यावसायिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे रीतसर चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतरही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक येत नाहीत हे लक्षात आल्यानंतर निर्माते तो चित्रपट ओटीटी माध्यमावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू करत असल्याचे दिसून आले आहे. ९ सप्टेंबरला प्रदर्शित झालेला अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट कमीतकमी चार महिने तरी ओटीटी माध्यमांवर उपग्रह वाहिन्यांवर दिसणार नाही, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात विक्रमी कमाई करण्यात अपयशी ठरलेला हा चित्रपट याच आठवडय़ात म्हणजे दोन महिन्यांपेक्षाही कमी वेळेत डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे. 

कल्की कृष्णमूर्ती यांच्या कादबंरीवर आधारित आणि मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन’ हा तमिळ चित्रपट चित्रपटगृहांत ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने तिकीट खिडकीवर चांगली कमाई केली, मात्र अपेक्षित यश साधता न आलेला हा चित्रपट ४ नोव्हेंबरला अ‍ॅमेझोन प्राइम व्हिडीओवर  प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग देशभरात हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नडा आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला होता. 

चित्रपटगृह व्यावसायिक, निर्माते – वितरक यांच्यातील करारानुसार एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या आठ आठवडय़ांनंतर तो चित्रपट ओटीटी वा अन्य माध्यमावर प्रदर्शित होऊ शकतो. याआधी चित्रपट प्रदर्शनासाठी चित्रपटगृह हे एकमेव माध्यम असल्यामुळे वेळेअभावी प्रेक्षकांना अनेक चांगल्या चित्रपटांना मुकावे लागत होते. मात्र, ओटीटी माध्यमामुळे आपल्या वेळेनुसार आपल्या आवडीचे चित्रपट पाहण्याची सोय प्रेक्षकांना उपलब्ध आहे. त्यामुळे जवळपास सर्वच चित्रपट ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित केले जातात. चित्रपटगृहात प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी आले नाहीत तरी ओटीटीवर देशातीलच नव्हे जगभरातील प्रेक्षकसंख्या चित्रपटाला मिळते, हा अनुभव निर्मात्यांनी घेतला आहे. त्यामुळे चित्रपट प्रसारणाचे हक्क लगोलग ओटीटी माध्यमांना विकण्यासाठी निर्माते प्रयत्नशील असतात. याशिवाय, विविध भाषिक प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचण्यास मदत होते हे आणखी वैशिष्टय़.

अनेकदा एखादा मोठा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याची पायरेटेड आवृत्ती प्रेक्षकांना लगेच आणि सहज उपलब्ध होते. त्यामुळे पायरसीचा फटका बसू नये म्हणूनही निर्माते ओटीटी प्रसारणाची घाई करताना दिसतात. चित्रपट प्रसारणाची विविध माध्यमे आणि वाहिन्यांचे जाळे सर्वदूर पसरल्यामुळे चित्रपटगृहांमधील प्रेक्षकांची गर्दी ही अलीकडच्या काळात ओटीटी माध्यमांवर अधिक दिसते आहे. घरबसल्या चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने ओटीटी प्रसारण हक्कापोटी मिळणारी रक्कम आणि जगभरातील प्रेक्षकसंख्या असा दुहेरी फायदा निर्मात्यांना मिळतो.

अक्षयचा ‘राम सेतू’ही.. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्षभरात सर्वाधिक चित्रपट करणारा अभिनेता अशी ओळख असलेल्या अक्षय कुमारला या वर्षी चित्रपटांमध्ये फारसे यश आले नाही. रक्षाबंधनह्ण, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘बच्चन पांड’ आणि आता ‘राम सेतू’ असे अक्षयचे एकामागोमाग एक  चित्रपट अयशस्वी ठरले. २५ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेला  ‘राम सेतू’ हा चित्रपट लवकरच  ‘प्राइम व्हिडीओ’वर प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जाते. तिकीट खिडकीवर दणकून आपटलेला हा चित्रपट ओटीटी माध्यमावर तरी आपली जागा टिकवून ठेवतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याशिवाय, याच चित्रपटाच्या जोडीने प्रदर्शित झालेला अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची मुख्य भूमिका असलेला ‘थॅंक गॉड’ हा चित्रपटही सपशेल आपटला असून तोही लवकरच ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.