गेली काही वर्षे सातत्याने वैविध्यपूर्ण आशय-विषय, भव्य निर्मिती, उत्तम कलाकारांच्या जोरावर सातत्याने चांगले मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहेत. मात्र, मराठी प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहापर्यंत येत नाहीत. एकीकडे मराठी चित्रपटांना प्रेक्षकसंख्या कमी मिळते आहे, तर दुसरीकडे नामांकित ओटीटी माध्यमांवर मराठी चित्रपट विकत घेतले जात नाहीत, अशी खंत चित्रपट निर्माते आणि मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी व्यक्त केली. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओसारख्या नामांकित ओटीटी कंपन्यांनी मराठी चित्रपटांना प्राधान्य दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच यासाठी लवकरच चित्रपट सेनेच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे अमेय खोपकर यांनी स्पष्ट केले.
‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा २’च्या यशानंतर संजय जाधव दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा ३’ हा चित्रपट १८ जुलैपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर अॅरो पिक्चर्स निर्मित ‘येरे येरे पैसा ३’ चित्रपटाची सहनिर्मिती वर्डविझार्ड एंटरटेनमेंटने केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते अमेय खोपकर, निनाद बत्तीन आणि चित्रपटातील कलाकार संजय नार्वेकर, आनंद इंगळे, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, ईशान खोपकर आणि तेजस्विनी पंडित यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात भेट देत मनमोकळा संवाद साधला.
प्रेक्षकांच्या मागणीनुसारच नवीन भाग
‘येरे येरे पैसा’ चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर कथानक प्रेक्षकांना आवडले आणि प्रेक्षकांनीच सांगितले की दुसऱ्या भागाची निर्मिती करा. तेव्हा दडपण व जबाबदारी वाढली. त्यानंतर ‘येरे येरे पैसा २’ चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यामुळे ‘येरे येरे पैसा ३’सुद्धा प्रेक्षकांच्या मागणीनुसारच बनविण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे तिन्ही भागांमध्ये व्यक्तिरेखा सारख्या आहेत, मात्र प्रत्येक भागातील कथानक वेगळे असून परिणामकारक दृश्यचौकटीतून उत्तम मनोरंजन साधण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक भागात साचेबद्ध चौकटी मोडण्याचा प्रयत्न केला असून मांडणी नावीन्यपूर्ण आहे, असे अभिनेता संजय नार्वेकर यांनी सांगितले. तर या म्हणण्याला दुजोरा देत अमेय खोपकर म्हणाले, पहिल्यांदा ‘येरे येरे पैसा’ चित्रपट करताना ठरविले नव्हते की दुसरा व तिसरा भाग काढायचा. हा चित्रपट पाहून प्रेक्षकांची उत्सुकता उत्तरोत्तर वाढत गेली आणि त्यांच्या मागणीनुसारच ‘येरे येरे पैसा २’, ‘येरे येरे पैसा ३’ हे नवीन भाग आणले. पहिल्या भागापासून तिसऱ्या भागांपर्यंत छोटे – मोठे प्रसंग करणारे जवळपास सर्वच कलाकार आहेत. आता ‘येरे येरे पैसा ४’ची निर्मिती करून त्यामध्ये अभिनय करायला आवडेल अशी इच्छा सलमान खान यांनी व्यक्त केल्याने त्याचाही मार्ग मोकळा झाला असल्याचे प्रतिपादन खोपकर यांनी केले.
…आणि निर्णायक वळण मिळाले
लोकांना आवडणाऱ्या चित्रपटांचा भाग होणे, ही एखाद्या कलाकारासाठी आनंदाची व महत्त्वाची गोष्ट असते. माझ्या २५ वर्षांच्या कारकीर्दीत विविध सुपरहिट चित्रपटांचा भाग होता आले, यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो. मात्र कलाकाराच्या आयुष्यात चढउतार येत असतात. जेव्हा मध्यंतरी माझ्याकडे काम नव्हते, तेव्हा ‘येरे येरे पैसा’ चित्रपटात छान भूमिका करण्याची संधी मिळाली. सनी लोकांच्या पसंतीस उतरला होता. तेव्हा माझ्या कारकीर्दीला एक निर्णायक वळण मिळाले. अमेय खोपकर, संजय जाधव यांनी खंबीरपणे पाठिंबा दिला आणि एकूणच ‘येरे येरे पैसा’ चित्रपटाच्या यशामुळे आत्मविश्वास मिळाला, असा अनुभव सिद्धार्थ जाधव याने सांगितला.
जाधव यांची माध्यमांवरची पकड उत्तम
‘येरे येरे पैसा’ चित्रपटातील माझी आणि संजय नार्वेकर यांची केमिस्ट्री संजय जाधव यांना माहीत होती. त्यामुळे ते प्रत्येक प्रसंग व पात्र विकसित करायला वेळ द्यायचे. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना हवे ते घ्यायचे, संजय जाधव यांची माध्यमांवरची पकड उत्तम असून पात्रं खुलत जातात, असे अभिनेता आनंद इंगळे यांनी सांगितले. तर प्रत्येक पात्राची सीमा दिग्दर्शकाला माहिती असल्यामुळे, कोणतेही पात्र वाहवत गेले नाही, असे संजय नार्वेकर यांनी सांगितले.
ओळख निर्माण होण्यापासून ती टिकविण्यापर्यंतचा संघर्ष
मनोरंजनसृष्टीत पदार्पण केल्यानंतर कलाकारांना स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी सुरुवातीला संघर्ष करावाच लागतो, त्यानंतर कलाविश्वात निर्माण झालेली ओळख टिकवण्याचा आणि या प्रवाहात वैविध्यपूर्ण भूमिकांचे प्रयोग करायचा तर त्यासाठीही वेगळा संघर्ष करावा लागतो, आपले काम लोकांना आवडेल, नाही आवडेल याची भीती असते, असे तेजस्विनी पंडित हिने सांगितले. तर या अनुषंगाने बोलताना संजय नार्वेकर म्हणाले, स्वत:ची विशेष ओळख निर्माण करण्यासाठी मी अभिनय क्षेत्रात आलो. आपल्याला लोकांनी ओळखावे आणि आपल्यावर प्रेम करावे, हे प्रत्येक कलाकाराला मनोमन वाटते. या दृष्टीने कलाकार मेहनत करीत असतात. या अथक परिश्रमातून ओळख निर्माण होते. जेव्हा तुमची काम करण्याची पद्धत लोकांना आवडते, तेव्हा ती पद्धत कलाकाराची विशेष शैली म्हणून ओळखली जाते. ‘मराठी प्रेक्षक सुजाण असून प्रगल्भ विचार करणारे आहेत. हे प्रेक्षक खऱ्या अर्थाने आपल्या कलाकारांवर जिवापाड प्रेम करतात. त्यामुळे आम्ही मराठी कलाकार सुदैवी आहोत. मराठी कलाकार नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबमालिका अशा सर्व माध्यमांमध्ये सारख्याच ताकदीने काम करतात, असे चित्र अन्य कुठल्याही भाषिक चित्रपटसृष्टीत पाहायला मिळत नाही’ असे मत अभिनेता उमेश कामतने व्यक्त केले. मराठीत सातत्याने वेगळे विषय मांडले जात आहेत. मात्र आजही मराठी चित्रपटांसाठी आगाऊ नोंदणीच्या वेळीच हाऊसफुल्लचा बोर्ड लागत नाही, ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रेक्षक, कलाकार व तंत्रज्ञांकडून एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे, असेही मत उमेशने व्यक्त केले.
(शब्दांकन : अभिषेक तेली)