मारधाडपट, थरार, गुन्हेगारी, प्रेमकथा अशा विविध प्रकारच्या वेबमालिकांचा प्रेक्षक ओटीटीला लाभलेला आहे, तसाच भयपटाचाही स्वतःचा असा वेगळा प्रेक्षक आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या हॉरर मालिका, सिनेमे अधूनमधून ओटीटीवर येत असतात. अशीच अलीकडे ‘अंधेरा’ नावाची आठ भागांची मालिका ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाली आहे. जसजशी मालिका पुढे जाते तसे ओटीटीवरील जाणत्या प्रेक्षकाला ‘स्ट्रेंजर थिंग्ज’ या इंग्रजीत गाजलेल्या मालिकेची झलक आठवत राहते. या मालिकेचे भारतीयीकरण करण्याचा प्रयत्न मात्र उत्तम कथा, पटकथेअभावी फिका पडला आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी अशी कोणती ना कोणती घटना घडलेली असते, जी पुढे संपूर्ण आयुष्यभर मनावर गारूड करून राहते. भूतकाळातले असे सल घेऊन प्रत्येक जण वावरत असतो. पण ते आपण मनाच्या कुठल्याशा अंधाऱ्या कोपऱ्यात दडवून ठेवलेले असतात. कालौघात ही अपराधीपणाची बोच किंवा सलणारी गोष्ट त्या अंधाऱ्या जगातून बाहेर डोकावू लागते आणि तो अंधार जणू आपल्याला गिळून टाकू लागतो… अंधाराला अशी ओळख देऊन, त्याची भीती दाखवण्यात ‘अंधेरा’ ही आठ भागांची वेबमालिका यशस्वी ठरते.

या संकल्पनेवरील कथेचे बीज भक्कम होते, पण त्यातून उगवलेले पटकथारूपी रोप मात्र तितके मजबूत नसल्याने मालिकेचा डोलारा नीट सांभाळला गेला नाही. त्यामुळे व्हीएफएक्स आणि एआयसारखे तंत्रज्ञान वापरून दाखवलेले उत्तम स्पेशल इफेक्ट दचकवणारे, भीतीदायक असूनही आणि विशेष म्हणजे कलाकारांचा अभिनयही तितक्या ताकदीचा असूनही ही वेबमालिका प्रेक्षकांवर प्रभाव पाडण्यात कमी पडते. विज्ञान, तंत्रज्ञान, सायकोथ्रिलर आणि भूत, आत्मा वगैरे सर्व प्रकार आणि भारंभार उपकथांमध्ये गुरफटल्याने मालिकेत खूप पसारादेखील झाला आहे.

मालिका एका भयावह दृश्याने सुरू होते. बानी बारूआ (जान्हवी रावत) अत्यंत भीतीदायक पद्धतीने गायब होते. त्याच वेळी डॉ. पृथ्वी सेठ (प्रणय पचौरी)चा अपघात होऊन तो कोमात जातो. त्याचा भाऊ जय (करणवीर मल्होत्रा) आधीच नैराश्येने ग्रस्त असतो. त्यात या अपघाताने भर पडते आणि तो भयावह अंधार त्याचा माग काढू लागतो. आपले विचित्र अनुभव तो अशाच सुपरनॅचरल विषयांवर पॉडकास्ट करणाऱ्या रुमी (प्राजक्ता कोळी) ला सांगतो.

दुसरीकडे आपल्या भूतकाळातल्या नकारात्मक घटनेमुळे अस्वस्थ असणारी पोलीस निरीक्षक कल्पना कदम (प्रिया बापट) बानीच्या केसचा उलगडा करता करता आत्मा नावाच्या प्राणिक हीलिंग सेंटर चालवणाऱ्या आयेशा ओबेरॉय (सुरवीन चावला) च्या संपर्कात येते. मग सुरवीनची एक कथा. मग पुन्हा या केसशी संबंधित जी जी पात्रं येतात त्यांच्या उपकथा. अशा सर्व उपकथांच्या जंजाळात मूळ कथा बाजूला पडते. अंधार नामक जी भयावह गोष्ट उभी केली आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी एका कॉमिक बुकचा आधार घ्यावा लागणे हे तर अनाकलनीय आणि हास्यास्पद वाटते.

प्रिया बापटने कल्पना कदमचे पात्र दमदार पद्धतीने साकारले आहे. भूतकाळातला मनावर झालेला आघात, व्यावसायिक ताण तिने उत्तम उभा केला आहे. प्राजक्ता कोळी, सुरवीन चावला, करणवीर मल्होत्रा या सर्वांनी ताकदीने आपापली पात्रं जिवंत केली. पण विसविशीत कथा-पटकथेमुळे त्या अभिनयावर, स्पेशल इफेक्ट्सवर मालिकेच्या नावाप्रमाणे झाकोळ पसरून राहिला. त्यामुळे आठ भागांत खेचलेल्या या लांबलचक कथेला आपण अखेरपर्यंत बांधलेले राहिलो तरी शेवटी हाती काही न लागल्याचा अनुभव येतो.

अंधेरा

दिग्दर्शक – राघव दार

ओटीटी – ॲमेझॉन प्राइम