scorecardresearch

City Of Dreams 3 Review : सत्तासंघर्ष, डावपेच अन् राजकीय कुटुंबाची एक वेगळी बाजू; कसा आहे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ सीझन ३?

City of Dreams Season 3 : प्रिया बापट, अतुल कुलकर्णी यांच्या लाजवाब अभिनयासाठी पाहायलाच हवा हा नवा सीझन

City-of-Dreams-Season-3-Review-in-Marathi
सिटी ऑफ ड्रीम्स सीझन ३ रिव्ह्यू

City of Dreams Season 3 Review : आजवर आपण मराठीत ‘सिंहासन’सारखे, हिंदीत ‘राजनीती’सारखे पोलिटिकल ड्रामा असलेले चित्रपट पाहिलेले आहेत. अगदी ओटीटीचा सुळसुळाट झाल्यापासून ‘हाऊस ऑफ कार्डस्’सारख्या वेब सीरिजही प्रेक्षकांनी चवीने पाहिल्या आहेत, आता भारतीय वेब विश्वात अशाच एका पोलिटिकल थ्रिलर वेब सीरिजची एन्ट्री झाली आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजचा तिसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, आणि याच्या आधीच्या सीझनप्रमाणेच हा सीझनही ट्विस्ट आणि एकामागून एक मिळणाऱ्या सरप्राइजेसनी भरलेला आहे. याचा पहिला सीझन मला बऱ्याच गोष्टींमुळे खटकला होता, पण दुसऱ्या आणि खासकरून या तिसऱ्या सीझनमध्ये कथानक तुम्हाला इतकं खिळवून ठेवतं की सीरिजच्या त्या मायानगरीत तुम्ही अक्षरशः हरवून जाता.

दुसऱ्या सीझनचा शेवट जिथे झाला त्यानंतर काहीच काळानंतरचं हे कथानक आपल्यासमोर उलगडायला सुरुवात होते. मुलाच्या मृत्यूचा धक्का पचवू न शकलेली महाराष्ट्राची मुख्यमंत्री पूर्णिमा गायकवाड(प्रिया बापट) ही अज्ञातवासात जाते, त्यानंतर तिथून ती गायब होते अन् तिच्या जागी अॅक्टिंग सीएम म्हणून पदभार सांभाळणारे तिचे वडील म्हणजेच साहेब अर्थात अमेयराव गायकवाड(अतुल कुलकर्णी) हे एन्काऊंटर स्पेशलीस्ट वसिम खान (एजाज खान) याच्यावर पूर्णिमाला शोधून आणायची जबाबदारी सोपवतात. काही दिवसांनी वसिम खान पूर्णिमाला घेऊन परत येतो खरा पण तोवर महाराष्ट्रातील राजकारणात आणि महाराष्ट्र जनशक्ती पार्टीत बरीच खलबतं व्हायला सुरुवात झालेली असते. साहेबांचे खास मित्र आणि अत्यंत कपटी, धूर्त असा राजकारणी जगदीश गुरव (सचिन पिळगांवर) हा त्याचे खरे रंग दाखवायला सुरुवात करतो.

आणखी वाचा : Bandaa Movie Review : कथित संतांच्या कुकर्मावर भाष्य करणारा, मनोज बाजपेयींचा ‘बंदा’ नेमका कसा आहे? जाणून घ्या

एकीकडे मुलाच्या धक्क्यातून स्वतःला सावरत महाराष्ट्राच्या जनतेचं भलं करू पाहणारी पूर्णिमा गायकवाड, दुसरीकडे एकामागून एका अडचणींना तोंड देणारे, आणि आपल्या मलिन होत असलेल्या प्रतिमेला सावरणारे अमेयराव गायकवाड, अन् तिसरीकडे महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल अशा राजकीय कुटुंबात दरी निर्माण करून दिल्लीची स्वप्नं पाहणारा जगदिश गुरव असे तीन वेगवेगळे प्लॉट आपल्यासमोर उलगाडतात. शिवाय गायकवाड कुटुंबाच्या जिवावर उठलेला जगन (सुशांत सिंग) आणि याच जगनपासून गायकवाड कुटुंबाचं अन् खासकरून पुर्णिमाचं संरक्षण करणारा वसिम खान हे दोघेसुद्धा या खेळात आपआपल्या वतीने योगदान देताना आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय अजूनही अशा बऱ्याच गोष्टी आहे ज्या अमेयराव गायकवाड यांच्यापासून लपवून ठेवल्या आहेत, त्या समोर आल्यावर अमेयराव नेमकं काय करणार? पूर्णिमा पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी मुख्यमंत्री म्हणून पाहायला मिळणार का? यात वसिम खानची नेमकी काय भूमिका आहे अन् जगदिश गुरव नेमका कोणतं कारस्थान करणार? या सगळ्याची उत्तरं आपल्याला या तिसऱ्या सीझनमध्ये मिळतात.

एकंदर खुर्चीसाठी चालू असलेला हा खेळ, या खेळादरम्यान पूर्णिमा गायकवाड आणि वसिम खान यांच्यात निर्माण झालेलं अत्यंत जिव्हाळ्याचं मैत्रीचं नातं ही या वेब सीरिजची सर्वात महत्त्वाची आणि सकारात्मक गोष्ट. एक आई म्हणून आणि एक महिला मुख्यमंत्री म्हणून पूर्णिमाचा कणखरपणा, वडिलांबद्दल बऱ्याच उलट सुलट गोष्टी कानावर पडूनही त्यांच्याबरोबर तिचं बदलणारं नातं, राजकारणात भल्याभल्यांना उद्ध्वस्त करेल असे पूर्णिमाचे डावपेच आणि हे सगळं पाहताना समोर येणारा क्लायमॅक्स पाहून आपल्याला एक सर्वोत्कृष्ट क्राइम थ्रिलर अनुभवल्याचा आनंद मिळतो.

नागेश कुकुनूर आणि रोहित बाणावलीकर लिखित अन् दिग्दर्शित या वेब सीरिजची कथा, पटकथा आणि खासकरून तिसऱ्या सीझनमधील यातील पात्रांचे उतार चढाव हे फारच उत्तमरित्या स्क्रीनवर दाखवले आहेत. पोलिटिकल थ्रिलर म्हंटल्यावर संवाद तर लाजवाब असणारच त्यात काहीच शंका नाही, पण खासकरून या तिसऱ्या सीझनमध्ये अगदी छोट्यातल्या छोट्या पात्रावर ज्याप्रकारे मेहनत घेण्यात आली आहे त्यासाठी या दोघांचे आभार मानावेच लागतील. खासकरून यातील पूर्णिमा गायकवाडच्या पात्राचा आलेख आणि क्लायमॅक्स पाहिल्यावर ‘हाऊस ऑफ कार्डस्’ या वेबसीरिजमधील क्लेअर अंडरवुडची आठवण आल्याखेरीज रहात नाही.

दमदार कथा संवाद, वेगवान पटकथा या सगळ्याला उत्तम जोड मिळाली आहे ते यातील कलाकारांच्या जबरदस्त अदाकारीची. अतुल कुलकर्णी यांचं अमेयराव गायकवाड यांच्या पात्रावर या नव्या सीझनमध्ये पूर्ण फोकस नसला तरी यात बऱ्याच ठिकाणी अतुल यांचा तगडा अभिनय पाहायला मिळतो. एकीकडे राजकीय संघर्ष आणि दुसरीकडे कौटुंबिक कलह यातून कसाबसा सावरत बाहेर पडणाऱ्या अमेयराव गायकवाड उर्फ साहेब यांचा प्रवास उत्तमरीत्या उलगाडला आहे. राजकारण सोडून पुन्हा पोलिसात आलेला वसिम खानच्या बिनधास्त स्वभावाबरोबरच त्याची एक हळवी बाजू यात आपल्याला पाहायला मिळते. खासकरून पूर्णिमाबरोबरची त्याची मैत्री ही यातील मुख्य बाजू, अन् यात एजाज खान यांनी उत्तम काम केलं आहे. मुळात त्यांचं व्यक्तिमत्व, आवाज, देहबोली पाहता हे पात्र एजाज यांच्याशिवाय कदाचित कुणीच करू शकलं नसतं.

सचिन पिळगांवकर यांनी साकारलेल्या कपटी जगदीश गुरव या पात्राने मात्र या सीझनमध्ये मनसोक्त बॅटिंग केली आहे, या पात्राचे बरेच पैलू या तिसऱ्या सीझनमध्ये उलगडतात त्यामुळे याबद्दल जास्त काही सांगण्यापेक्षा सचिन यांची लाजवाब अदाकारी तुम्ही एकदातरी अनुभवायलाच हवी. अगदी त्यांच्या ‘कट्यार…’मधील खांसाहेब प्रमाणेच ही भूमिकादेखील अत्यंत वेगळी आहे आणि प्रेक्षकांना सचिन यांना अशाच प्रकारच्या भूमिकेत पाहायला आवडेल. याबरोबरच इतरही सहकलाकारांची कामं उत्तम झाली आहेत. विभाच्या भूमिकेत दिव्या सेठ शाह, तसेच एका मीडिया चॅनलचा मालक आणि कॅपिटलिस्टची भूमिका साकारणारा रणविजय हे दोघे लक्षात राहतात.

आणखी वाचा : “व्हिस्कीची बाटली अन् अभिनेता…” निवृत्तीबद्दल सचिन पिळगांवकर यांचं मोठं वक्तव्य

या सगळ्यांपेक्षा काहीसं वरचढ काम प्रिया बापटचं आहे हे मात्र हा सीझन पाहिल्यावर आपल्या तोंडी येतं. मुळात या पात्राचा तिसऱ्या सीझनमधील आलेख, इमोशनल ब्रेक डाउन, त्यातून सावरत पुन्हा राज्याची सगळी सूत्रं हातात घेणारी एक कणखर स्त्री, आपल्यावर टीका करणाऱ्यांना एकहाती गप्प करणारी तर काहींचा प्रश्न निकालात काढणारी एक धूर्त राजकारणी, तितकीच हळवी मुलगी अन् मैत्रीण हे सगळं प्रिया बापटने अगदी हुबेहूब पडद्यावर साकारलं आहे. ज्या लाईव्ह न्यूज शोमध्ये आपलं चारित्र्यहनन होत आहे त्याच लाईव्ह शोमध्ये जाऊन जनतेशी थेट संवाद साधणं किंवा क्लायमॅक्सला आलेला ट्विस्ट हे प्रियाला एक दमदार अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून देणारं आहे. भारतीय वेब विश्वात मी आत्तापर्यंत तरी इतकी स्ट्रॉंग महिलेची व्यक्तीरेखा आजतागयात पाहिलेली नाही. प्रिया ती भूमिका अक्षरशः जगली आहे.

पहिल्या सीझनमध्ये अमेयराव गायकवाड हे पूर्णिमाला मुलगा मुलगी मधला फरक सांगताना एक गोष्ट सांगतात ती म्हणजे पुरुषांमध्ये असलेली क्रूरता ही कधीच स्त्रियांमध्ये येणार नाही, पुरुषांमध्ये ती उपजत असते. अमेयराव गायकवाड यांच्या याच उत्तराला पूर्णिमाने या सीझनच्या क्लायमॅक्सला आपल्या कृतीतून दिलेलं प्रत्युत्तर ही यातील आणखी एक महत्त्वाची अधोरेखित करण्यासारखी गोष्ट. आता पूर्णिमाने नेमकं कशा पद्धतीने उत्तर दिलं ते तुम्हाला या सीझनमध्ये बघायला मिळेल. अशा बऱ्याच कमी भारतीय वेब सीरिज आहेत ज्या तिसऱ्या सीझनपर्यंत पोहोचल्या आहेत, त्यापैकीच एक खिळवून ठेवणारी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ डिज्नी प्लस हॉटस्टारवर बघायला विसरू नका आणि जर तुम्हाला पोलिटिकल थ्रिलर आवडत असतील तर ही सीरिज अजिबात चुकवू नका.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2023 at 09:33 IST

संबंधित बातम्या