Best Crime Thriller Movie on OTT: करोनाच्या साथीनंतर ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर कलाकृती पाहण्याचं प्रमाण वाढलं आहे. आता चित्रपट प्रेमींसाठी घरबसल्या जगभरातील चित्रपट, मालिका आणि शो त्यांच्या फोनवर उपलब्ध आहे. आधी नवीन चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही केव्हाही, कुठेही फोनवर सिनेमे पाहू शकता.
कोणताही नवीन चित्रपट थिएटरला आला की दीड ते दोन महिन्यांत ओटीटीवर रिलीज केला जातो. आता तर कमी बजेटचे चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित केले जातात, अशा चित्रपटांना ओटीटीवर खूप चांगला प्रतिसाद मिळतो. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक सर्वाधिक क्राइम-थ्रिलर सिनेमे पाहतात.
बॉलीवूड असो किंवा दाक्षिणात्य चित्रपट, लोकांना त्यातलं सस्पेन्स आणि थ्रिल खूप आवडतं. जर तुम्हाला क्राइम थ्रिलर चित्रपट पाहायला आवडत असतील, तर आज आम्ही तुम्हाला एक असाच चित्रपट सांगणार आहोत, जो तुम्ही प्राइम व्हिडीओवर नक्की पाहायला हवा. या चित्रपटाचा क्लायमॅक्स ‘दृश्यम’सारखाच दमदार व अनपेक्षित आहे.
कोणता आहे चित्रपट?
या चित्रपटाचं नाव ‘V1 मर्डर केस’ आहे. १ तास ४५ मिनिटांचा हा एक थ्रिलर सस्पेन्स तेलुगू चित्रपट आहे. हा सिनेमा पावेल नवगीथन यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात राम अरुण कास्त्रो आणि विष्णुप्रिया पिल्लई यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. गायत्री, लिजीश आणि माइम गोपी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. एकदा सुरू केलात की तुम्ही स्क्रीनपासून नजर हलवूच शकत नाही.
V1 मर्डर केस सिनेमाची कथा
‘V1 मर्डर केस’ चित्रपटाची कथा एका खूनाच्या प्रकरणाभोवती फिरते. चित्रपटात एका मुलीचा खून होतो, जी तिच्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असते. या प्रकरणाचा तपास अग्नी नावाचा एक फॉरेन्सिक अधिकारी करतो. हा अधिकारी मर्डरची मिस्ट्री सोडवण्यासाठी दिवस-रात्र तपास करत असतो, पण त्याला अंधाराची भीती वाटते. तपासादरम्यान त्याला कळतं की त्या मुलीच्या बॉयफ्रेंडचाही मृत्यू झाला आहे. या सिनेमातील ट्विस्ट आणि वळणं पाहून तुमचं डोकं चक्रावेल.
चित्रपट कुठे पाहू शकता?
‘V1 मर्डर केस’ चित्रपट प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तसेच युट्यूबवर त्याची हिंदी डब आवृत्तीही उपलब्ध आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ६.७ रेटिंग मिळालं आहे. तुम्हाला मर्डर मिस्ट्री असलेले सिनेमे पाहायला आवडत असतील तर ‘V1 मर्डर केस’ हा एक चांगला पर्याय आहे.