नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय सीरिज ‘फौदा’चा पाचवा सीझन येणार आहे. तुम्ही या सीरिजचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ‘फौदा’च्या पाचव्या सीझनचा बहुप्रतिक्षीत पहिला ट्रेलर नुकताच इस्रायली ब्रॉडकास्टरने रिलीज केला आहे. ‘फौदा’चा सीझन २०२६ मध्ये प्रीमियर होणार आहे.
इस्रायली सुरक्षा दलाचे माजी अधिकारी लिओर राझ आणि अवी इस्साचरॉफ यांनी ‘फौदा’ ही सीरिज तयार केली आहे. इस्रायली-पॅलेस्टिनी संघर्षाची कथा या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. ज्या पद्धतीने खऱ्या लोकेशनवर शूट केलेली वास्तववादी दृश्ये सीरिजमध्ये दाखवण्यात आली, त्यामुळे या सीरिजचं जागतिक स्तरावर खूप कौतुक झालं होतं. या सीरिजचे प्रेक्षक जगभरात आहेत. ‘फौदा’च्या पाचव्या सीझनमध्ये आधीच्या पर्वांपेक्षा आणखी जास्त राजकीय आणि भावनिक गोष्टी दाखवण्यात येतील, असं ट्रेलरवरून दिसतंय.
जीव धोक्यात घालून निर्मात्यांनी या सीरिजचं शूटिंग केलं. हमासच्या हल्ल्यानंतर निर्मात्यांनी या सीरिजचं कथानक बदलण्यात आलं. या मालिकेत सागुईची भूमिका साकारणारा इदान अमेदी हा खऱ्या आयुष्यात जानेवारी २०२४ मध्ये गाझा येथे झालेल्या लढाईत गंभीर जखमी झाला होता. सीरिजमधील इतरही कलाकार युद्धात सहभागी झाले होते.
डोरॉनच्या टीमला एका मोठ्या दहशतवादी धोक्याला सामोरं जाताना वैयक्तिक आघाताचा सामना करावा लागतोय असं या सीझनच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.
पाहा ट्रेलर-
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर आणि स्वॉर्ड्स ऑफ आयर्न युद्ध सुरू झाल्यानंतर दोन वर्षांनी ‘फौदा’चा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फौदा’ या शब्दाचा अरबी भाषेतील अर्थ ‘अराजकता’ असा आहे. ‘फौदा’ची कथा इस्रायली सुरक्षा एजन्सी मोसाद आणि पॅलेस्टिनी दहशतवाद्यांमधील संघर्ष दाखवते. ‘फौदा’च्या चौथ्या सीझनमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि अनेक भावनिक ट्विस्ट पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता पाचव्या सीझनमध्ये, डोरॉन आणि त्याच्या टीमसाठी नवीन आव्हान काय असेल? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
‘फौदा’च्या मागील चार सीझनना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता चाहते सीझन ५ बद्दल खूप उत्सुक आहेत. सोशल मीडियावर या सीरिजच्या पाचव्या सीझनच्या पहिल्या ट्रेलरबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. ट्रेलर आला असला तरी अद्याप निर्मात्यांनी पाचव्या पर्वाच्या प्रदर्शनाची तारीख मात्र जाहीर केलेली नाही.