The Haunting of Hill House Series : ओटीटीवर जगभरातील चित्रपट, वेब सीरिज, शो बघायला अनेकांना आवडतं. चित्रपट रसिक तर रोज ओटीटीवर नवीन काय पाहता येईल, याचा विचार करत असतात. तुम्हालाही ओटीटीवर सीरिज बघायची असेल तर आज आम्ही तुम्हाला एका दमदार सीरिजबद्दल सांगणार आहोत. या सीरिजला आयएमडीबीवर ८.५ रेटिंग मिळालं आहे, त्यावरून तुम्हाला सीरिजच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल. हॉलीवूडचे दिग्गज लेखक स्टिफन किंग यांनी या सीरिजचं कौतुक करत ‘जिनियस’ म्हटलं होतं.
या हॉरर सीरिजने नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घातला आहे. भीती व भावनांची गुंतागुंत असलेल्या या सीरिजने एक नवीन बेंचमार्क सेट केला आहे. या सीरिजचे नाव ‘द हॉंटिंग ऑफ हिल हाऊस’ आहे. माइक फ्लॅनागन दिग्दर्शित ही सीरिज एका विखुरलेल्या कुटुंबाची कथा आहे. हे कुटुंब त्यांच्या जुन्या घराच्या भयानक आठवणी आणि तिथे घडलेल्या भयानक घटनांना सामोरे जात असते. ही कथा वर्तमान आणि भूतकाळात फिरते, जिथे प्रत्येक भागात कुटुंबातील सदस्यांच्या वेदना व भीती समोर येते.
‘द हॉंटिंग ऑफ हिल हाऊस’ ही फक्त एक हॉरर सीरिज नाही; तर कुटुंब, नातेसंबंध, आघात आणि भावनांची कहाणी देखील आहे. मालिकेतील सर्वात जास्त चर्चेत असलेला ट्विस्ट म्हणजे ‘बेंट-नेक लेडी’ची खरी ओळख, जी प्रेक्षकांना हादरवून सोडते. तसेच ‘रेड रूम’चे रहस्य प्रत्येक भागाबरोबर अधिकच वाढत जाते, जे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
सीरिजची ग्लोबल क्रेझ
ही सीरिज रिलीज झाल्यानंतर काही दिवसांतच, ही मालिका नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेंडिंग लिस्टमध्ये समाविष्ट झाली. रॉटन टोमॅटोजवर ९१% क्रिटिक स्कोअर आणि ९३% ऑडियन्स स्कोअर यामुळे ती या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेली हॉरर सीरिज बनली.
तुम्हाला हॉरर व फॅमिली ड्रामा सीरिज पाहायची असेल तर ही सीरिज तुमच्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे. या सीरिजमधील ट्विस्ट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतील. यातील भावुक क्लायमॅक्स पाहून तुमच्या डोळ्यातून पाणी येईल.