प्रेक्षकांचा थरकाप उडवणारा एक हॉरर थ्रिलर चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला ज्याची प्रचंड चर्चा झाली. मल्याळम सुपरस्टार मामूट्टी यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट म्हणजे ‘ब्रमयुगम’. अनपेक्षितपणे या चित्रपटाला सगळीकडे प्रतिसाद मिळाला अन् प्रेक्षकांनी याला डोक्यावर घेतलं. अवघ्या १५ दिवसांत चित्रपटाने ५२ कोटींची कमाई करत धमाकेदार कमाई केली.
मल्याळम चित्रपट असल्याने आणि हा चित्रपट इतर कोणत्याही भाषांमध्ये डब करण्यात आला नसल्याने उत्तरेकडील राज्यांमध्ये या चित्रपटाला तसे फारसे शोज मिळाले नाहीत. अगदी मोजक्याच चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकल्याने बऱ्याच प्रेक्षकांना हा हॉरर चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाला नाही. पण आता मात्र हा चित्रपट प्रेक्षकांना लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पाहता येणार आहे.
आणखी वाचा : पंतप्रधानांकडून ‘BeerBiceps’ फेम रणवीर अलाहबादीयाला विशेष पुरस्कार; मोदी म्हणाले, “तू बीजेपीवाला…”
राहुल सदाशिवन दिग्दर्शित, ‘ब्रमयुगम’मधून गुलामगिरीतून सुटका झालेल्या गायकाची कथा उलगडून दाखवली जाते जो एका रहस्यमयी अशा घरात आश्रय घेतो, परंतु आत राहणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीमुळे त्याला काही भयानक प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यानंतर ही कथा एक रोमांचक वळण घेते, अन् तो पुढील संघर्ष पाहताना प्रेक्षक अक्षरशः त्यांच्या खुर्चीला खिळून हा थरार अनुभवतात.
मामूट्टी यांचा हा ‘ब्रमयुगम’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मने या चित्रपटाचे हक्क विकत घेतले असून हा चित्रपट येत्या १५ मार्चपासून या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून त्यांनी या चित्रपटाच्या डिजिटल रिलीजची घोषणा केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि मामूट्टी, अर्जुन अशोकन, सिद्धार्थ भारतन आणि अमाल्डा लिज या कलाकारांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. प्रेक्षक याच्या ओटीटी रिलीजसाठी प्रचंड उत्सुक आहेत.