scorecardresearch

‘सेक्रेड गेम्स ३’ येणार नाही; अनुराग कश्यपचं मोठं विधान, दिग्दर्शकाने स्पष्ट केलं यामागील कारण

अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने आणि नीरज घायवान यांनी मिळून या वेबसीरिजची निर्मिती केली होती

anurag kashyap about sacred games 3
फोटो : इंडियन एक्सप्रेस

आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप कायम चर्चेत असतो. नुकतंच त्याने ‘पठाण’ या चित्रपटाला मिळालेल्या यशावर भाष्य करत बॉयकॉट करणाऱ्या लोकांचा चांगलाच समाचार घेतला. राजकारणावरसुद्धा अनुराग बऱ्याचदा भाष्य करतो ज्यामुळे तो कित्येकवेळा अडचणीतही सापडला आहे. नुकतंच त्याने एका मुलाखतीमध्ये ‘सेक्रेड गेम्स’च्या तिसऱ्या सीझनबद्दल भाष्य केलं आहे.

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली पहिली वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स’ची चांगलीच हवा झाली, याचा पहिला सीझन प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला, पण या सीरिजच्या दुसऱ्या सीझनला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हापासूनच याच्या तिसऱ्या सीझनबद्दल चर्चा सुरू आहे. नुकतंच अनुराग कश्यपने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. एका मुलाखतीमध्ये अनुरागने ‘सेक्रेड गेम्स ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही हे स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा : बॉलिवूड कलाकार देणार यश चोप्रा यांच्या आठवणींना उजाळा; ‘या’ दिवशी होणार ‘The Romantics’ ही सीरिज प्रदर्शित

सैफ अली खानची ‘तांडव’ ही वेबसीरिज यासाठी कारणीभूत असल्याचंही अनुरागने स्पष्ट केलं आहे. ‘तांडव’ या वेबसीरिजमधील एका सीनमुळे चांगलाच वादंग निर्माण झाला होता. याविषयीच बोलताना अनुराग म्हणाला, “सेक्रेड गेम्स ३ प्रेक्षकांसमोर आणण्याएवढी हिंमत आता नेटफ्लिक्समध्ये राहिलेली नाही, कारण तांडवमुळे निर्माण झालेल्या वादामुळे बरेच ओटीटी प्लॅटफॉर्म हे घाबरले आहेत.” त्यामुळे सेक्रेड गेम्सच्या चाहत्यांसाठी ही निराशाजनक बातमी आहे.

अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने आणि नीरज घायवान यांनी मिळून या वेबसीरिजची निर्मिती केली होती. यातील शिवीगाळ आणि काही बोल्ड सीन्समुळे ही वेबसीरिज चांगलीच चर्चेत होती. अनुराग कश्यपचा आगामी ‘ऑल्मोस्ट प्यार विथ डिजे मोहब्बत’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. ३ फेब्रुवारीला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 12:05 IST
ताज्या बातम्या