ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दर आठवड्याला अनेक नवीन चित्रपट व सीरिज रिलीज होत असतात. सध्या नेटफ्लिक्सवर एका सीरिजचा जलवा पाहायला मिळतोय. ही एका आठवड्यात सर्वात जास्त तास पाहिली गेलेली सीरिज ठरली आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच ही सीरिज ३४१ मिलियन तास (३.४१ कोटी) पाहिली गेली. या सीरिजने ३३५ मिलियन तासांचा रेकॉर्ड असलेल्या ‘स्ट्रेंजर थिंग्स 4’ ला देखील मागे टाकलंय.
या सीरिजचं नाव Wednesday आहे. ही अमेरिकन सुपरनॅचरल मिस्ट्री कॉमेडी टीव्ही सीरिज आहे. या सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये जेना ऑर्टेगा मुख्य भूमिकेत होती. तिच्याबरोबर एम्मा मायर्स, ग्वेंडोलिन क्रिस्टी, रिकी लिंडहोम, जेमी मॅकशेन, हंटर डूहान, जॉय संडे, जॉर्जी फार्मर, नाओमी जे. ओगावा आणि क्रिस्टीना रिक्की या कलाकारांनीही विविध भूमिका साकारल्या होत्या.
Wednesday सीरिजची कथा
Wednesday ही एक सुपरनॅचरल मिस्ट्री सीरिज आहे. याची कथा नेव्हरमोर अकादमीमध्ये Wednesday अॅडम्स नावाच्या मुलीभोवती फिरते. ती तिच्या मानसिक शक्तींचा उत्तम वापर करून सलग घडणाऱ्या हत्या प्रकरणांचा तपास करते. Wednesday अॅडम्सला पूर्वी पाच वर्षांत आठ शाळांमधून काढून टाकण्यात आलं असतं. वैतागून तिचे पालक, मोर्टिसिया आणि गोमेझ तिला मोर्टिसियाच्या जुन्या शाळेत, नेव्हरमोर अकादमीमध्ये पाठवतात. ही शाळा अशाच मुलांसाठी असते ज्यांना काढून टाकलेलं असतं. ही सीरिज म्हणजे रोमांच, रहस्ये व सुपरनॅचरल शक्तींचा मिलाफ आहे.
Wednesday ने पटकावले अनेक पुरस्कार
Wednesday च्या पहिल्या सीझनचे चार एपिसोड टिम बर्टन यांनी दिग्दर्शित केले होते. रिलीजच्या तीन आठवड्यातच हा इंग्रजी भाषेतील सर्वाधिक पाहिला गेलेला दुसरा शो ठरला. याने दोन गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स जिंकले होते. तसेच चार प्राइमटाइम अॅमी अवॉर्ड्सही पटकावले. या शोचा पहिला सीझन २०२२ मध्ये आला होता. आता ६ ऑगस्ट २०२५ व ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुसरा सीझन दोन भागात रिलीज केला जाणार आहे.
Wednesday ला आयएमडीबीवर किती रेटिंग मिळालं?
Wednesday शोला आयएमडीबीवर १० पैकी ८ रेटिंग मिळालं आहे. पहिल्या सीझनचे चाहते आता दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. दुसरा सीझन पहिल्या सीझनपेक्षाही दमदार कमाई करेल, असा अंदाज या शोची लोकप्रियता पाहता व्यक्त केला जात आहे.
कुठे पाहायची Wednesday सीरिज?
Wednesday ही सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. ही सीरिज हिंदीसह इतर बऱ्याच भाषांमध्ये उपलब्ध आहे.
नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिले गेलेले टॉप 5 शोज
Wednesday ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिली गेलेली इंग्रजी वेब सीरिज आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर Adolescence, तिसऱ्या क्रमांकावर ‘स्ट्रेंजर थिंग्स’, चौथा क्रमांकावर Dahmer व पाचव्या क्रमांकावर Bridgerton आहे.
नेटफ्लिक्सवरील टॉप 5 नॉन इंग्लिश शोज
नेटफ्लिक्सवर फक्त इंग्रजीच नाही तर जगभरातील इतर भाषांमधील वेब सीरिजही उपलब्ध आहेत. नेटफ्लिक्सवरील टॉप 5 नॉन इंग्लिश शोजच्या यादीत पहिल्या तीन क्रमांकावर ‘स्क्विड गेम’ आहे. चौथ्या क्रमांकावर ‘मनी हाइस्ट’ व पाचव्या क्रमांकावर Lupin आहे.