सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणित केल्यानंतरही संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’च्या वाटेतील अडथळे काही केल्याने कमी होत नाहीयेत. सुरुवातीपासूनच चित्रपटाच्या विरोधात असलेल्या राजपूत करणी सेनेने आता एक वेगळीच मागणी केली आहे. यातील व्यक्तिरेखांची नावेच बदलून टाका अशी मागणी करणी सेनेने केली आहे.
करणी सेनेचे सदस्य महिपाल सिंह मकराणा म्हणाले की, ‘पहिल्या दिवसापासूनच आम्ही या चित्रपटाच्या बंदीची मागणी करत आहोत. सेन्सॉर बोर्डाने इतिहासकार आणि राजघराण्यातील उत्तराधिकाऱ्यांची समिती नेमली. त्या समितीने हा चित्रपट पाहिला आणि त्यातील बऱ्याच गोष्टींवर आक्षेप दर्शवला. फक्त पैसे कमावण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या नावासोबतच आता त्यातील व्यक्तिरेखांचीही नावे बदलण्यात यावी.’ या मागणीसोबतच मकराणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना याप्रकरणी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले.
वाचा : सलमानचा भाऊ असल्याचे तोट्यांपेक्षा फायदेच जास्त- अरबाज खान
‘आतापर्यंत आम्ही या चित्रपटाविरोधात अत्यंत शांततापूर्ण आंदोलने आणि निदर्शने केली. पंतप्रधान मोदींनी यावर आता मौन सोडावे. नाहीतर यापुढे जे परिणाम होतील त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असतील,’ असा धमकीवजा इशाराच मकराणा यांनी दिला.
वाचा : लैंगिक शोषण करणाऱ्यांची वेळ संपली आहे- ओपरा वीन्फ्रे
सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाचे नाव आणि इतर काही बदल सुचवत यु/ए प्रमाणपत्र दिले. ‘पद्मावती’वरून ‘पद्मावत’ असे नाव करण्यास सेन्सॉरने सांगितले होते. यावरही अध्यक्ष प्रसून जोशी आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी करणी सेनेने केली होती. आता २५ जानेवारीला हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट कोणत्याही अडथळ्यांशिवाय प्रदर्शित होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.