भारतीय रंगभूमीवर महत्त्वाचं असलेलं पगला घोडाहे नाटक महाराष्ट्र कल्चरल सेंटर रंगमंचावर आणत आहे. या नाटकातून वेगळा प्रयोग करण्यात येत असून, प्रेक्षकांच्या मधोमध हे नाटक घडणार आहे. या नाटकाचा प्रयोग गुरुवारी (२१ डिसेंबर) सुदर्शन रंगमंच येथे सायंकाळी सात वाजता होणार आहे.

गावाबाहेरच्या स्मशानात दूरवर जळणाऱ्या चितेची सोबत करताना चौघे जण पत्ते खेळत, दारू पीत, प्रेताची कवटी फुटायची वाट पाहत बसतात. एकमेकांची थट्टा करत, हसत-खिदळत, फार तर जिचं प्रेत जळतंय, त्या कुणा एका परक्या मुलीबद्दल चविष्ट गप्पा मारणारे हे चार जण हळूहळू बदलतात, आतून उसवत जातात. उत्तर न सापडणारे अनेक प्रश्न विचारून हे नाटक अस्वस्थ करते. बादल सरकार यांच्या मूळ बंगाली नाटकाचा हिंदी अनुवाद प्रतिभा अगरवाल यांनी केला आहे. तर, सचिन जोशी आणि अमृत सामक यांनी दिग्दर्शन केलं आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटरनं नाटकाची निर्मिती केली आहे. नाटकात नरेश गुंड, आशिष त्रिपाठी, भूषण पाटील, प्रसाद हरिदास, अमृता पटवर्धन, अंकिता नाईक, पारुल देशपांडे, गौरी कडू यांच्या भूमिका आहेत.

नाटकाविषयी दिग्दर्शक सचिन जोशी आणि अमृत सामक म्हणाले, भारतीय रंगभूमीवर ‘पगला घोडा’ हे फार महत्त्वाचं नाटक आहे. आम्ही या नाटकाचा विचार जरा वेगळय़ा दृष्टीनं केला आहे. या नाटकाचं सादरीकरण हा एक प्रयोग आहे. पारंपरिक रंगमंचीय अवकाश मोडून सँडविच पद्धतीनं हे नाटक सादर होणार आहे. त्यातून अभिनेत्यांना आणि कलाकारांना नक्कीच वेगळा नाटय़ानुभव मिळेल.

सायफाय करंडकातून बदलत्या सायबर विश्वाचं दर्शन

आताचा काळ जितका डिजिटल होत आहे, तितकं मानवी आयुष्यही बदलत आहे. या बदलत्या मानवी आयुष्याचा वेध एकांकिकांमधून घेतला जाणार आहे. सायबर विश्वावर आधारित एकांकिका असलेल्या सायफाय करंडक स्पध्रेची अंतिम फेरी भरत नाटय़ मंदिर येथे शुक्रवारपासून (२२ डिसेंबर) तीन दिवस होणार आहे. राज्यभरातल्या १९ एकांकिकांचा अंतिम फेरीत समावेश आहे.  क्विकहिल फाऊंडेशन, पुणे पोलीस, एक्स्प्रेशन लॅब आणि आणि पंख स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होणार आहे. ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या धर्तीवरची ही स्पर्धा आहे. अंतिम फेरीत पुण्यासह नगर, नाशिक, कल्याण, गोवा, सिंधुदुर्ग इथल्या एकूण १९ एकांकिका सादर होणार आहेत. या एकांकिकांमधून माहिती तंत्रज्ञानाचा विविध अंगाने मानवी जीवनावर होणारा सकारात्मक-नकारात्मक परिणाम दिसणार आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सायबर युगातलं नाटक रंगमंचावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. युवा दिग्दर्शक आलोक राजवाडे आणि अभिनेत्री अश्विनी गिरी अंतिम फेरीचे परीक्षण करणार आहेत. या स्पध्रेसाठी प्रवेश विनामूल्य आहे.   स्पध्रेविषयी आयोजक प्रदीप वैद्य म्हणाले, सायबर विश्वाला वाहिलेल्या एकांकिका ही संकल्पना पहिल्यांदाच प्रत्यक्षात आली आहे. त्याला प्रतिसादही उत्तम मिळाला. या अंतिम फेरीतून पुणेकर प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी विचार करायला लावणारा नाटय़ानुभव मिळेल.

chinmay.reporter@gmail.com