नाटकाकडून चित्रपटाकडे वळलेल्या दिग्दर्शक परेश मोकाशींच्या ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाला लोकांकडून आणि समीक्षकांकडूनही पसंतीची पावती मिळाली. मराठी चित्रपटांच्या इतिहासात ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा मैलाचा दगड ठरला आहे. आता पुन्हा एकदा परेश मोकाशी नविन विषय आणि नविन चित्रपट घेऊन येत आहेत. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ प्रमाणेच याही चित्रपटाचे वेगळेपण त्याच्या नावापासूनच सुरू होते. ‘एलिझाबेथ एकोदशी’ असे या चित्रपटाचे नाव असून लहान मुलांच्या भावविश्वाची नवी कथा या चित्रपटातून उलगडणार आहे.
संतवाणीची शिकवण आणि न्यूटनचे नियम म्हणजेच विज्ञानाची आस असणाऱ्या एका मुलाच्या ज्ञानेशच्या नजरेतून एक नवा विषय मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटातून केला आहे. पंढरीच्या ज्ञानेशला विठूरायाची ओढ आहे आणि त्याचे आपल्या वडिलांनी दिलेल्या सायकलवर (एलिझाबेथ) अतोनात प्रेम आहे. ज्ञानेशच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्याची आणि त्याच्या बहिणीची जबाबदारी एकटय़ा आईवर आहे. आई, आजी, बहिण एवढेच सदस्य असलेल्या ज्ञानेशच्या कुटुंबावर एक संकट येतं. त्यांना त्यांच्या एलिझाबेथला या संकटातून वाचवायचं असतं. एलिझाबेथला वाचवण्यासाठी ऐन एकादशीच्या उत्सवात ही लहानगी एक खेळ मांडतात. त्यांच्या या प्रयत्नांची कथा म्हणजेच ‘एलिझाबेथ एकादशी’.
‘लय भारी’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ सारख्या कलाकृती देणाऱ्या एस्सेल व्हिजनची प्रस्तुती असलेल्या ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाची कथा मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिली असून चित्रपटाचे संवाद आणि पटकथाही त्यांनीच परेश मोकाशींच्या सोबतीने लिहिली आहे. या चित्रपटात ज्ञानेशच्या भूमिकेतील श्रीरंग महाजन, मुक्ताच्या भूमिकेतील सायली भंडारकवठेकर यांच्याबरोबरच नंदिता धुरी, वनमाला किणीकर, पुष्कर लोणारकर, चैतन्य बडवे, दुर्गेश बडवे, चैतन्य कुलकर्णी, अश्विनी भालेकर आणि अनिल कांबळे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. ‘एलिझाबेथ एकादशी’ हा लहानग्यांच्या भावविश्वात डोकावण्याची संधी देणारा चित्रपट १४ नोव्हेंबरला बालदिनाच्या मुहूर्तावर सगळीकडे प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paresh mokashi new film elizabeth ekadashi
First published on: 04-11-2014 at 06:26 IST