नीलेश अडसूळ
एकापाठोपाठ एक गाजलेले चरित्रपट, सिनेमातील वेगळेपण, ‘तुला पाहते रे’च्या निमित्ताने पुन्हा एकदा मालिका विश्वात केलेला दणदणीत प्रवेश आणि ‘अश्रूंची झाली फु ले’ या नाटकाने केलेला विक्रम असे यशाचे भक्कम मनोरे पाठीशी बाळगणारा अभिनेता सुबोध भावे आता ‘जय जय महाराष्ट्र माझा’ असा जयघोष करताना दिसणार आहे.
‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या आगामी कार्यक्रमात सुबोध सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार असून महाराष्ट्राच्या मातीतील समृद्ध लोककलेच्या आणि लोकसंस्कृतीच्या वारीमध्ये तो सामील झाला आहे.
महाराष्ट्रातील खेडय़ापाडय़ापासून ते अभिजनांपर्यंत प्रत्येकालाच लोककलेविषयी आकर्षण असते. ढोलकी वाजली की पाय थिरकले नाहीत तरी मन मात्र थिरकू लागतं. संबळ वाजला की नास्तिकातही आस्तिकतेची आस्था निर्माण होते. अशा या लोकवाद्यांनी, लोककलांनी कुणाला भुरळ घातली नसेल तर तो अपवादच ठरेल. हाच समृद्ध वारसा जगासमोर आणण्याचा घाट ‘सोनी मराठी’ वाहिनीने घातला आहे. महाराष्ट्राच्या लोककला जगासमोर अजून सादर करणाऱ्या लोककलावंतांना मालिकेच्या माध्यमातून मानवंदना देण्यात येणार आहे. याविषयी सुबोध म्हणतो, आपल्या लोककलांविषयी सध्याच्या पिढीला माहिती मिळणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या लोककला कोणत्या, ते सादर करणारे लोककलावंत कोण आहेत, कोणत्या भागातील आहे, ते कशा पद्धतीने लोककला पुढे घेऊन चालले आहेत याबाबतचे ज्ञान महाराष्ट्रातल्या प्रत्येकालाच असायला हवे. या निमित्ताने महाराष्ट्रभरातील लोककलांची आणि लोककलावंतांची माहिती जगासमोर येणार आहे. शिवाय ज्यांनी आजवर ती इथपर्यंत आणली अशा दिग्गज लोककलावंतांचाही सन्मान या निमित्ताने केला जाणार आहे, असे त्याने सांगितले. लोककलांवर आधारित या कार्यक्रमात कोणतीही स्पर्धा किंवा चुरस नाही. तर हा केवळ सोहळा आहे जिथे आनंदाची देवाणघेवाण होईल, असे त्याने स्पष्ट केले. कार्यक्रमातील त्याच्या भूमिकेविषयी बोलताना, मला संधी मिळेल तिथे मी आपल्या भाषा, कला आणि संस्कृतीचा पुरस्कार करत असतो. या निमित्ताने कलाकार आणि माणूस म्हणून मला अनेक गोष्टी शिकता येतील. लोककलांबाबत जवळून जाणून घेता येईल. आजवर सूत्रधार म्हणून अनेकदा काम केले, परंतु हे केवळ निवेदन नाही तर, हा संवाद आहे, असेही सुबोधने सांगितले.
निवेदकाची भूमिका म्हटली की अभ्यास हा आलाच, परंतु मालिका, नाटक, चित्रपट अशा सर्व रामरगाडय़ातून वेळ काढून अभ्यास करणे तसे कठीण असते. याविषयी तो सांगतो, या कार्यक्रमात लोककलांचा अभ्यास जगासमोर मांडायचा असल्याने मला त्याची पूर्ण तयारी करावी लागते. यासाठी लोककलेचे अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांचे मला मार्गदर्शन मिळते. त्यांच्याशी चर्चा करून बऱ्याच गोष्टी उलगडत जातात. शिवाय इथे येणाऱ्या प्रत्येक कलाकारापासून शिकावे तेवढे कमीच आहे. महाराष्ट्रात एवढय़ा विविध विषयांवरची कवने, पोवाडे, लावण्या लिहून ठेवल्या आहेत की त्याचे स्वरूप अवाक् करणारे आहे, असे सांगतानाच त्यांचे हेच पडद्यामागचे काम जगासमोर आणणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे सुबोधने सांगितले.
कलाकारांचे सामाजिक भान..
महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे ग्रामीण जीवन विस्कळीत झाले. त्या वेळी कशाचीही तमा न बाळगता सुबोध भावे, प्रवीण तरडे अशा कलाकारांनी समाजमाध्यमातून कलाकारांना आणि सामान्य लोकांना आवाहन केले आणि बघता बघता मदतीचा पाऊ स पडला. आताही अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांची बिकट अवस्था पाहून प्रवीण तरडे पुन्हा मदतीसाठी धावून गेले आहेत. या अनुभवाविषयी सुबोध सांगतो, महाराष्ट्रावर येणाऱ्या प्रत्येक संकटात धावून जाणे हे मराठी कलाकार म्हणून आमचे कर्तव्य आहे. प्रवीण शेतकरी कुटुंबातून आला असल्याने त्याला या समस्यांची अधिक जाणीव आहे. म्हणून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला आम्ही सर्वच कलाकार कायम सज्ज असतो. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान न भरून काढण्यासारखे आहे, परंतु कलाकारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, शासकीय साहाय्य मिळावे या उद्देशाने हे कार्य सुरू आहे. या माध्यमातून सरकार आणि सामान्य माणूस यांना जोडण्याचे काम कलाकार करत आहेत. भविष्यात सर्व कलाकारांचे संघटन करून महाराष्ट्राच्या दुर्गम भागातील काही गावे दत्तक घेण्याचाही आमचा मानस आहे. आणि याही कार्यात प्रचंड लोकसहभाग विश्वासाने कलाकारांसोबत उभा राहील, अशी आशा त्याने व्यक्त केली.
याचसंदर्भात पुढे बोलताना, आपल्याकडे मदत करण्याची प्रत्येकाची इच्छा असते, मात्र पुढाकार कोणी घ्यायचा यावर घोडे अडते. अशा वेळी कलाकारांनी घेतलेल्या पुढाकारावर लोक विश्वास ठेवत असतील तर असे प्रतिनिधित्व कायम केले जाईल, असेही त्याने सांगितले. याचा सकारात्मक अनुभव पूरस्थितीत आला. कलाकारांच्या आवाहनाला लोकांनी इतका प्रतिसाद दिला की, २० ट्रक भरून सामान पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पोहोचवले गेले. विशेष म्हणजे कोणत्याही शंका मनात न आणता लोकांनी सढळ हस्ते दान केले, असे सांगतानाच लोकांनी दाखवलेल्या या विश्वसाबद्दल मनात कायम आदर राहील, असेही त्याने सांगितले.
वाचन वृद्धिंगत होवो..
सुबोधच्या वाचनाविषयी कायमच बोलले जाते, त्याविषयी तो सांगतो, तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असेल तर वेळ काढणे सहज शक्य होते. मुळात वाचन ही प्रत्येकाला समृद्ध करणारी कला असल्याने प्रत्येकाने भरभरून वाचायला हवे. आजही मी महाराष्ट्रात किंवा जगभरात कुठेही चित्रीकरणासाठी गेलो तरी माझी पुस्तके माझ्या सोबतच असतात. माणसाने वेळ मिळेल तसं वाचायला हवं. केवळ वाचनच नव्हे तर सिनेमाही आपल्याला खूप काही शिकवून जातो. त्यामुळे नवनवीन चित्रपट वेळ मिळेल तसे पाहावेत. आज इंटरनेटमुळे पुस्तकं आणि चित्रपट कुठेही सहज उपलब्ध होतात. त्याचा पुरेपूर आनंद घेता यायला हवा. वाचनासाठी वेळ काढा वगैरे म्हणणे गैर आहे, आपल्याकडे वेळ असतोच, फक्त त्या वेळात वाचन करायचे हे लक्षात राहायला हवे, असेही त्याने सांगितले.
गप्पांच्या मैफलीचे स्वप्न..
आज अनेक कलावंत आपापल्या मित्रांबरोबर मिळून नवीन काही तरी करण्याचा प्रयत्न करत असतात, असाच मानस सुबोधनेही या निमित्ताने बोलून दाखवला आहे. सुबोध म्हणतो, कलाकारांना आपल्या व्यग्र दिनक्रमातून नेहमी वेळ काढता येतोच असं नाही, परंतु या देशात काही अशा व्यक्ती आहेत की ज्यांच्यासाठी आपण वेळ काढायला हवा, त्यांचे कार्य आणि अनुभव ऐकायला हवेत, त्यांच्याशी संवाद व्हायला हवा. आपल्याला त्यांच्याकडे जाणे शक्य नसल्याने त्यांनाच आपल्याकडे आमंत्रित केले तर स्वत: सोबत अनेकांना तो अनुभव घेता येईल. त्यामुळे विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींना बोलावून किमान महिन्यातून एकदा तरी अशी रम्य गप्पांची मैफील करावी अशी कल्पना असल्याचे त्याने स्पष्ट के ले. तसा प्रयत्नदेखील केल्याची माहिती त्याने दिली.
वेबसीरिज मनासारखी हवी..
एकीकडे प्रत्येक कलाकाराचा ओढा वेबसीरिजकडे आहे, परंतु सुबोध मात्र त्यात कुठेच दिसत नाही. अनेक वेबसीरिजकरिता विचारणा झाली होती, आजही होते. परंतु सध्या सुरू असलेल्या व्यापातून वेबसीरिज करणे मला शक्य नाही. भविष्यात वेबसीरिज नक्कीच करेन परंतु मला हवा असलेला आशय त्यात यायला हवा, असे त्याने सांगितले. आज आपल्याकडे असे अनेक विषय आहेत जे आपल्या विचारांपलीकडचे आहेत. ते मांडणारी एखादी वेबसीरिज झाली तर नक्कीच काम करेन. यामध्ये भारतातील मिथक आशयाला प्राधान्य दिले पाहिजे, कारण आजपर्यंत मिथककथांकडे दुर्लक्ष झाले आहे. आणि असे एखादे मिथक वेबसीरिजवर आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, असे सूतोवाचही त्याने केले.
लहान मुलांसाठी चित्रपट करणार
लहान मुलांचे भावविश्व रेखाटणारे चित्रपटच आज उरले नाहीत, याबद्दलही त्याने खंत व्यक्त केली. जे चित्रपट येतात ते लहान मुलांना सतत शहाणपण शिकवणारे असतात. शाळा, घर, परिसर सगळीकडेच त्यांना कोणी तरी शहाणपण शिकवतच असते. त्यात किमान चित्रपटाने तरी मुलांना शहाणपण शिकवू नये असे मला वाटते. मुलांना चित्रपटाविषयी ओढ वाटावी असा एक तरी सिनेमा आहे का, असा मला कायम प्रश्न पडतो. म्हणूनच आता बालविश्वाचा वेध घेणे सुरू आहे. लवकरच खास लहान मुलांसाठी एखादा चित्रपट घेऊ न येणार असल्याचे त्याने सांगितले. प्रगत होत चाललेल्या आशयात हरवल्यामुळे आपण परीकथा आणि आपल्यातले बालपण गमावून बसलो आहोत, याची खंत वाटत असल्याचे त्याने सांगितले.
जबाबदार प्रेक्षक हवा
आज मराठीतले अनेक चित्रपट तिकीटबारीवर अपयशी ठरत आहेत. तर जे चित्रपट विक्रम करू पाहणारे आहेत त्यांना चित्रपटगृहच मिळत नाहीत. प्राइम टाइमचे घोळ आजही तसेच आहेत. याविषयी सुबोध सांगतो, प्रत्येक गोष्टीला कलाकार, निर्मिती संस्था किंवा चित्रपटगृह जबाबदार नसतात. प्रेक्षकही याला जबाबदार आहेत. ‘तुमचे मराठी चित्रपट चालावेत म्हणून तुम्ही असे करता’, अशा भूमिका जेव्हा तरुण समाजमाध्यमांवर घेतात तेव्हा चीड येते. मराठी चित्रपट आमचे तर मग तुमचे काय, असा सवाल सुबोध करतो. इथल्या प्रेक्षकांना मराठी चित्रपट आपला वाटत नाही आणि जोवर त्यांच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण होत नाही तोवर हे चित्र बदलेल असे वाटत नाही. दुर्दैवाने हे चित्र महाराष्ट्रातच आहे. यावर तोडगा काढण्यासाठी कलाकार लवकरच पाऊ ल उचलतील, परंतु मराठी चित्रपट चालायचे असतील तर प्रेक्षकही जबाबदार हवा, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.