अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता दिलजित दोसांज यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘फिल्लौरी’ या चित्रपटाची सध्या बॉलिवूड वर्तुळात चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. प्रेक्षक आणि समीक्षकांनी अनुष्काच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरला चांगलीच पसंती दिली. ट्रेलरमागोमाग सध्या या चित्रपटाचे पोस्टरही चर्चेत आहेत. अनुष्का आणि दिलजितच्या लूकपासून ते अगदी या चित्रपटाच्या हटके कथानकाविषयी अनेकांनाच उत्सुकता लागून राहिली असताना चित्रपटातील दुसरे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘दम दम…’ या पहिल्या गाण्यानंतर आता ‘वॉट्स अप’ हे लग्नसराईसाठी साजेसे असे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. मिका सिंग आणि जसलीन रॉयल यांनी हे गाणे गायले आहे.

‘फिल्लौरी’ चित्रपट हा एका भूताची प्रेमकथा आहे. अनुष्का शर्मा, दिलजीत दोसांज आणि सूरज शर्मा यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. यात भूत दाखविण्यात आलेली शशी (अनुष्का) ही मेल्यावरही आपल्या प्रियकराच्या प्रतिक्षेत असल्याचे दाखविण्यात आले आहे. शशीच्या प्रियकराची भूमिका दिलजीतने साकारली आहे.

अनुष्काने स्वतः सोशल मिडीयावर ‘वॉट्स अप’ हे गाणे शेअर केले आहे. या गाण्यात लग्नाची तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत असून त्याचसोबत रितीरिवाज सुरु असल्याचेही दाखविण्यात आलेय. सजावट, ढोल आणि त्याच्या तालावर नाचणारे नातेवाईक यामुळे लग्नातील वातावरण गाण्यात पुरेपूर दिसून येते.

दरम्यान, ‘फिल्लौरी’ या चित्रपटाद्वारे अनुष्का शर्मा आणि दिलजित दोसांज ही एक नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘उडता पंजाब’ या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणारा अभिनेता दिलजित दोसांज आता बॉलिवूडमध्ये चांगलाच स्थिरावत आहे. त्यामुळे अनुष्का आणि दिलजितची एका वेगळया काळातील ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्येही उत्सुतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. २४ मार्चला अनुष्का आणि दिलजितचा हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.