अभिनेता स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांचा गाजलेला ‘मुंबई-पुणे-मुंबई’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. त्याच्या याच लोकप्रियतेमुळे या चित्रपटाचा पुढील भागही प्रदर्शित झाला. त्यानंतर आता या चित्रपटाचा तिसरा भाग ‘मुंबई -पुणे -मुंबई-३’ देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये १९७२ साली ‘पिंजरा’ या चित्रपटात लोकप्रिय ठरलेल्या गाण्याचा समावेश करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पिंजरा’ चित्रपटातील “कुन्या गावाची, कोनच्या नावाची, कुन्या राजाची गं तू रानी… आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी…ग साजनी” हे गाजलेले गाणं ‘मुंबई पुणे मुंबई-३’मध्ये स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. गाण्याचे प्रकाशन ढोल ताशांच्या निनादात विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे करण्यात आले. या गाण्याच्या प्रदर्शन सोहळ्यासाठी स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, सविता प्रभुणे, मंगल केंकरे, विजय केंकरे आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे हे कलाकार उपस्थित होते.

चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि निर्माते व एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटचे संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली (फ्रायडे सिनेमाज) यांनी या रहस्यावरील पडदा नुकताच उलगडला. प्रख्यात चित्रपट निर्माते व्ही.शांताराम यांच्या तुफान गाजलेल्या ‘पिंजरा’ चित्रपटातील हे गाणे ‘मुंबई पुणे मुंबई-३’मध्ये सामील करून ते आगळ्या पद्धतीने चित्रित केलं आहे.

‘गं साजणी’ या गाण्याचे पुनर्जीवित केले गेले असून त्याला राम कदम, अविनाश-विश्वजीत यांचे संगीत आहे तर आदर्श शिंदे यांचा आवाज आहे. मूळ गाणे जगदीश खेबुडकर यांचे असून त्यात विश्वजित जोशी यांनी भर घातली आहे. अतिरिक्त ऱ्हिदम प्रोग्रॅमिंग सुदेश गायकवाड यांचे आहे. या गाण्याचे चित्रीकरण साऊंडडिज येथे झाले असून ते किट्टू मायक्कल यांनी केले आहे. मिक्सिंग आणि मास्टरिंग एव्हीजे स्टुडीओजचे आहे. गाण्याच्या संगीत कलाकारांमध्ये सोमू सील (गिटार) व कोरस गायकांचा समावेश आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे.

सुपरहिट जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे, ख्यातनाम दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचे जुळलेले यशस्वी समीकरण पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. ‘मुंबई पुणे मुंबई-३’च्या माध्यमातून पुढील आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रोहिणी हट्टगडी, प्रशांत दामले, सविता प्रभुणे, सुहास जोशी, मंगल केंकरे आणि विजय केंकरे हे मराठीतील लोकप्रिय कलाकारही महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pinjara movie old song new version mumbai pune mumbai 3 movie
First published on: 01-12-2018 at 15:51 IST