तामिळमधील सुप्रसिद्ध टीव्ही सूत्रसंचालक आणि अभिनेत्री सबेर्ना साबू ही चेन्नईमधील मदुरावोयल येथील तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून सबेर्नाचे घर बंद होते. त्यानंतर तिच्या घरातून घाणेरडा वास येऊ लागल्याने शेजा-यांनी याबद्दल पोलिसांना कळवले. पोलीस आले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा आतून उघडाच असल्याचे कळले. तसेच, त्यांना घरात जाताच सबेर्नाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला.
सबेर्नाच्या मृत्यूचा संपूर्ण तामिळ इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. तिने टीव्ही सूत्रसंचालक म्हणून आपल्या करियरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने काही दैनंदिन मालिकांमध्येही काम केले. सन वाहिनीवरील ‘पसमलर’ तसेच स्टार विजय वाहिनीवरील काही मालिकांमध्येही तिने काम केले होते. तसेच, धनुषच्या ‘पदीकथवन’, विशालच्या ‘पूजाई’ आणि सिंबूच्या ‘कालै’ चित्रपटांमध्ये तिने छोट्या भूमिका साकारल्या होत्या. तिच्या मित्रमैत्रिणींनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सबेर्ना ही जितकी बोल्ड होती तितकीच ती भावनिकही होती. ती नात्यांना खूप गांभीर्याने घेत असे. पोलिसांना घटनास्थळी सबेर्नाने आत्महत्येपूर्वी लिहलेले पत्र मिळाल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, आता पोलिसांनी याप्रकरणी शोध घेण्यास सुरुवात केली असून सध्या तरी ही आत्महत्या असल्याचेच म्हटले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही.
टीव्ही अभिनेत्रींमध्ये यावर्षी मृतावस्थेत आढळणारी सबेर्ना ही दुसरी प्रसिद्ध अभिनेत्री आहे. याआधी, मार्च महिन्यात टीव्ही सूत्रसंचाकल आणि अभिनेता एस साई प्रशान्थ याने त्याच्या चेन्नईतील निवासस्थानी आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या पत्रात यासाठी कोणालाही जबाबदार मानू नये असे लिहले होते. प्रशान्थच्या आत्महत्येमागे एकाकीपण आणि उदासीनता ही कारणे असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते.