अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिचे आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत चालले आहे. प्रत्युषा आणि तिचा प्रियकर राहुल राज सिंग यांचे तिच्या आत्महत्येपूर्वीची भ्रमणध्वनीवरून केलेल्या संभाषणाची प्रत शुक्रवारी समोर आले.  त्या दोघांतील हे संभाषण तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले यावर प्रकाश टाकणारे आहे. शिवाय राहुलने तिला वेश्या व्यवसायात ढकलले होते आणि म्हणूनच तिने जीवन संपवल्याचे हे सूचित करत आहे. त्यामुळे प्रत्युषाचे पालक आणि तिच्या वकिलांनी याप्रकरणी पुनर्तपासणीची मागणी केली आहे.

आत्महत्येपूर्वी प्रत्युषाने राहुलला संपर्क साधला होता आणि त्यांच्यात तीन मिनिटे संभाषण झाले होते हे पुढे आले आहे. या संभाषणामध्ये प्रत्युषा राहुलला शिवीगाळ करून तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी त्याला दोष देत होती. संभाषणात तिने एका ठिकाणी ‘वेश्या व्यवसाय’ असा शब्दप्रयोग केला आहे. दरम्यान, प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळालेल्या राहुल राज सिंग विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी प्रसार माध्यमांनी प्रत्युषाने आत्महत्या करण्यापूर्वी राहुलशी केलेल्या भ्रमणध्वनीवरील संभाषणाचा काही भाग समोर आणला. या आत्महत्याप्रकरणी प्रत्युषाच्या पालकांची बाजू मांडत असलेले वकील नीरज गुप्ता पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, याप्रकरणी पोलिसांनी अनेक गोष्टींवर नजर टाकण्याची  गरज आहे. त्यामुळे आम्ही सदर प्रकरणी पुनर्तपासणी करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य तपास करायला हवा होता. परंतु त्यांच्याकडून तो केला जात नाही. त्यामुळेच प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी न्यायालयाकडे करणार असल्याचे ते म्हणाले.

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिने आत्महत्या करण्याच्या काही क्षण आधी प्रियकर राहुल राज सिंहसोबत भ्रमणध्वनीवरून केलेल्या संभाषणाची प्रत उपलब्ध झाली आहे. त्यात प्रत्युषाने म्हटलेय की,  ‘मी येथे अभिनयाच्या दुनियेत नाव कमावण्यासाठी आले होते.. काम करण्यासाठी आले होते.. पण तू मला आज कुठे आणून ठेवले आहेस.. राहुल तुला माहीत नाही या क्षणाला मला किती दु:ख होत आहे.. तू स्वार्थी आहेस.. तू माझे नाव खराब केले आहेस.. लोक माझ्याबद्दल वाईट बोलत आहेत.. राहुल सगळे संपले आहे.. मी संपले आहे..माझा मृत्यू झाला आहे..’
गोरेगाव येथील फ्लॅटमध्ये प्रत्युषाने १ एप्रिल रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती.  त्यानंतर राहुलवर पोलिसांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. मात्र उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने सध्या तो जामिनावर बाहेर आहे. राहुलच्या म्हणण्यानुसार तिचे आई-वडील आणि मित्रपरिवार आपल्याला   गोवत आहे. तिच्या पैशांसाठी आपण तिचा वापर करून घेतल्याचा  आरोप करत आहेत.