हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळाला तो हंबीरराव मोहिते यांना. त्यांची शौर्यगाथा आणि ख्याती अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यांचा हाच जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. नुकतंच या चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. तिथीनुसार साजर्‍या केल्या जाणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं.

‘सरेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या या नव्या पोस्टरमध्ये पिळदार शरीरयष्टी आणि रांगडा पेहराव यासोबतच हातात दुधारी तलवार (असिका) घेऊन उभे असलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते, अभेद्य असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगाकडे पाहताना दिसत आहेत. मावळत्या सूर्याच्या साक्षीने उभे असलेले ते एखाद्या कणखर कड्याप्रमाणे भासतात. त्यांच्या हातात असलेल्या दुधारी तलवारीच्या पातीला लागलेले रक्त बघता एका झुंजार सरसेनापतीचा धगधगता इतिहास प्रेक्षकांसमोर समोर येणार हे निश्चित. ‘जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखुनी खडा’ असे लिहिलेल्या या पोस्टरमध्ये दिसणारा अभिनेता नक्की कोण आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली असून या नव्या पोस्टरमुळे या चित्रपटाबद्दलची उत्कंठा सुद्धा वाढली आहे.

दरम्यान,सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचे आहे. तर संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य ऐतिहासिक मराठी चित्रपट जून २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravin tarde direct sarsenapati hambirrao marathi historical movie poster out ssj
First published on: 13-03-2020 at 11:47 IST