प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्यासाठी २०२३ या वर्षाची सुरुवात अतिशय चांगली झाली आहे. नुकताच त्यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट ऑस्करच्या यादीत समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर लगेचच आता याच चित्रपटाच्या ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजिनल गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे.

या पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ‘नाटू नाटू’चे म्युझिक कम्पोजर एम एम केरावनी यांनी पुरस्काराच्या घोषणेनंतर मंचावर जाऊन ट्रॉफी घेतली त्यानंतर त्यांनी पुरस्कारासह फोटोसाठी पोजही दिली. संपूर्ण भारतीयांसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. भारतातूनच नव्हे तर जगभरातून लोकांनी यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा – विश्लेषण : ‘नाटू नाटू’च्या सुरांनी भारतासाठी पहिलेवहिले ‘गोल्डन ग्लोब’ कसे जिंकले?

मनोरंजनसृष्टीतील कित्येक कलाकारांनीही राजामौली आणि ‘आरआरआर’च्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे. नुकतंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा या चित्रपटाला हा सन्मान मिळाल्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार जाहीर करतानाचा व्हायरल व्हिडिओ शेअर करत पंतप्रधानांनी लिहिलं, “खूप मोठं यश तुम्ही संपादन केलं आहे, त्यासाठी या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. तुम्ही हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवल्याने साऱ्या भारतीयांचं उर अभिमानाने भरून आलं आहे.”

PM narendra modi post
PM narendra modi post

आणखी वाचा – ‘RRR’ला पुरस्कार मिळाल्यानंतर ‘तेलुगू ध्वज’चा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचं ट्वीट; अदनान सामी म्हणाला…

जागतिक पातळीवर या चित्रपटाने १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. याआधी न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कल अवॉर्डमध्ये राजामौली यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. ऑस्करसाठीही शॉर्टलिस्ट झाल्यानंतर एखाद्या श्रेणीमध्ये ‘आरआरआर’ला नामांकन मिळावं अशी भारतीयांची अपेक्षा आहे.