जाड माणसांना टेन्शन असतं ते बारीक होण्याचं. जाड असण्यापासून ते बारीक होण्याच्या प्रवासाची मजेदार गोष्ट ‘वजनदार’ सिनेमातून प्रेक्षकांपूढे येणार आहे. प्रिया बापट आणि सई ताम्हणकर यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या सिनेमात प्रियाने एक गाणंही गायलं आहे. गायक रोहित राऊतसोबत तिने ‘गोलू मोलू’ हे गाणं गायलं आहे. जाड्या मुलींच्या मनातलं दुःख या गाण्यात प्रिया मांडताना दिसत आहे. हे गाणं सिद्धार्थ चांदेकर आणि प्रिया बापट यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. नाविन्यपूर्ण शब्द असलेले हे गाणए ओंकार कुलकर्णी याने लिहिले असून अविनाश- विश्वजित यांनी या सिनेमाला संगीत दिले आहे.
मुली आणि त्यांचं वजन हे नेहमीच चर्चेचा विषय असतो. प्रत्येक मुलीला ती एकतर फार जाड आहे किंवा बारीक आहे असंच वाटत असतं. या विषयावर भाष्य करणाऱ्या या सिनेमात सई आणि प्रिया यांची जोडी धमाल उडवणारी आहे. ‘जे बारीक नसतात त्या जाडच असतात,’ अशी थोडी आगळी वेगळी टॅगलाइनही या सिनेमाला देण्यात आली आहे.
दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी त्यांच्या फेसबुकवर ‘आई म्हणाली जीमला जा. बाबा म्हणाले जरा पळायला जा. मित्र म्हणाले, चल योगासने करु. सई आणि प्रिया म्हणाल्या चल पिक्चर करू.’ असे आकर्षक विधान करुन वजनदारचा ट्रेलर प्रदर्शित केला होता. याआधी ‘वजनदार’ सिनेमाचे फेसबुक पेज, पोस्टर आणि अॅनिमेटेड लोगो लाँच करण्यात आले होते.
विधि कासलीवाल यांच्या ‘लॅण्डमार्क फिल्म्स’तर्फे सादर होणाऱ्या आगामी ‘वजनदार’ या सिनेमात दोन नायिका आणि एक नायक आहे. मराठी सिनेसृष्टीतील प्रिया बापट आणि सई ताम्हणकर या नायिकांच्या तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा नायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा चिराग हा या सिनेमाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. सिनेमाची पटकथा आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांचे आहे. चेतन चिटणीस, समीर धर्माधिकारी हे कलाकारही सिनेमात आहेत. हा सिनेमा येत्या ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priya bapad sing a song for vazandaar movie
First published on: 20-10-2016 at 18:06 IST