रवींद्र पाथरे

१९८७ – ८८ मधली ही गोष्ट आहे. दादरच्या शिवाजी मंदिरात पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंचा बा. भ. बोरकर (तथा बाकीबाब!)  यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम होता. प्रेक्षागार खचाखच भरलेलं. पु. ल. आणि सुनीताबाईंच्या काव्यप्रेमाचा दबदबाच तसा. कार्यक्रम सुरू झाला.. आणि पु. ल. व सुनीताबाईंच्या मुखातून प्रत्यक्ष बाकीबाबच श्रोत्यांशी जणू संवाद साधू लागले. मंचावर कसलंही अवडंबर नाही. कवितेशी तादात्म्य पावलेले दोघंही जण. नितळ, पारदर्शी, तरल. रसिकही त्यात न्हाऊन निघालेले. ‘चाफ्याच्या झाडा’शी सुनीताबाईंचा संवाद.. कातर स्वरांतला. त्याची समजूत काढणारा. पण आतून त्याही हललेल्या. फक्त हुंदकाच फुटायचा बाकी.

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!

कवितांच्या लडीवर लडी उलगडताहेत.

‘मंद मंद वाजत आयली तुजी गो पैंजणा

त्या दिसा वडा कडेन गडद तिनसना

मंद मंद वाजत आयली तुजी गो पैंजणा..’

बाकी बाबांच्या या कोकणी कवितेतली पैंजणं प्रत्येकाच्या मनात रुणझुणताहेत. सारा श्रोतृवृंद त्यावर डोलतोय..

कट् टू..

पस्तीस वर्ष लोटलीयत. २०२३ साल. पुनश्च स्थळ : शिवाजी मंदिर.. कार्यक्रम : ‘प्रिय भाई.. एक कविता हवी आहे!’ सुनीताबाईंच्या भूमिकेत मुक्ता बर्वे!

तीच कविता : ‘चाफ्याच्या झाडा.. चाफ्याच्या झाडा..’ तोच गदगदलेला स्वर. तीच इन्टेन्सिटी. तेच तादात्म्य.

मुक्ता बर्वे हळूहळू धुक्याच्या गडद – गहिऱ्या पडद्याआड दिसेनाशी होते. तिच्या जागी सुनीताबाई प्रगटतात. त्या चाफ्याची समजूत काढताहेत. पण स्वर भिजलेला. गळय़ात आवंढा दाटलाय.

कविता संपते.

मुक्ताच्या पापण्यांच्या कडा पाणावलेल्या.

श्रोतेही दु:खभारले. सुन्न..

‘प्रिय भाई.. एक कविता हवी आहे!’

डॉ. समीर कुलकर्णी यांनी ‘अनुभव’ मासिकात लिहिलेल्या ‘तप:स्वाध्याय’ या लेखावर आधरित रंगाविष्कार! डॉ. समीर १९९८ साली एका हॉस्पिटलात काम करीत होते. साहित्याच्या ओढीनं ते आपल्या सहकाऱ्यांसह एक पाक्षिक भित्तीपत्रिका चालवीत. दरवेळी नवे विषय. त्या वर्षी १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेवर भित्तीपत्रिकेचा अंक काढायचं ठरलं.. ‘स्वातंत्र्य’ संकल्पनेचा विस्तार, त्यात अनुस्यूत असलेलं सारं काही ज्यात असेल अशा कवितांचा शोध सुरू झाला. कुणीतरी रवींद्रनाथ टागोरांची ‘व्हेअर द माइंड इज विदाऊट फीअर’  ही कविता सुचवली. शक्यतो बंगालीत – आणि त्यातही प्रत्यक्ष रवींद्रनाथांच्याच हस्ताक्षरात असेल तर सोन्याहून पिवळं.. ठरलं.

शोध सुरू झाला. व्यक्ती, वाचनालयं.. हा.. तो..! कविता मिळत होती.. विविध भाषांतलीही! पण प्रत्यक्ष रवींद्रनाथांच्या हस्ताक्षरातली हवी, हा हट्ट! सगळं जग उलथंपालथं करून झालं. पण छे! सापडेचना. बंगाली मित्रमंडळी, त्यांचे सगेसोयरेही धुंडाळून झाले.

तेवढय़ात कुणीतरी सुचवलं – पु. ल. ‘शांतीनिकेतन’ मध्ये जाऊन, राहून, बंगाली शिकून आलेत. कदाचित त्यांच्याकडे सापडेल. डॉ. समीरची सहकारी डॉ. धनश्री पुलंच्याच बिल्डिंगमध्ये राहणारी निघाली. तिच्याकरवी खडा टाकायचं  ठरलं. धनश्रीनं सुनीताबाईंकडे विचारणा केली. सुनीताबाई म्हणाल्या, ‘आहे. कुठल्यातरी कवितेच्या पुस्तकात आहे. शोधते.’

अन् शोध सुरू झाला..

मावळतीची किरणं अंगावर पांघरलेल्या सुनीताबाई आणि पुलं कामाला लागले. कारण विषय त्यांच्या आतडय़ांच्या ओढीचा होता : कविता!

यानिमित्तानं माळय़ावर गेलेले कवितासंग्रह खाली काढले गेले.  आरती प्रभू, ग्रेस, ना. धों. महानोर.. आणखीन कितीएक. ते चाळता चाळता भूतकाळाचा एकेक तुकडा, त्यासोबतचे ते कवितेचे क्षण, त्या आठवणी.. कवीच्या.. कवितेच्या उजळून निघाल्या. बाळाच्या जावळावरून हळुवार हात फिरवत त्याचं कौतुकभरलं चुंबन घ्यावं तसे पुलं आणि सुनीताबाई त्यात हरवलेले. धनश्री येता – जाता हे सारं न्याहाळतेय. शरिमदी होतेय. आपल्या य:कश्चित भित्तीपत्रिकेसाठी आपण पुलं आणि सुनीताबाईंना कामाला लावलंय. आणि तेही असे, की प्राण कंठाशी आणून त्या कवितेचा शोध घेताहेत. डॉ. समीरना हे कळल्यावर त्यांना अपराधभावानं ग्रासलंय.

डॉ. समीरचे सहकारी या सगळय़ा प्रकाराकडे फारच ‘लाइटली’ पाहताहेत. एका कवितेसाठी असे प्राण पाखडायची काय गरज? तरुणपणी कवितेचा नाद ठीकंय. पण आता? आता आयुष्याचे प्राधान्यक्रम बदललेत. पैसा, करीअर, प्रगतीचे इमले.. यात कविताबिविता येतेच कुठं?

डॉ. समीरना हे सगळं सहन होईनासं होतं. भौतिक प्रगती हीच का आयुष्याची इतिकर्तव्यता? मग रोबो आणि माणसांत फरक तो काय? कुठले कोण आपण?  रवींद्रनाथांची कविता काय मागितली.. आणि पुलं – सुनीताबाई जीवाच्या करारानं तिच्या शोधार्थ गेले दोन – तीन दिवस तहानभूक हरपून बसलेयत. आणि आपले मित्र..? त्यांना त्याबद्दल आदर वाटायचं सोडून या कविता वेडाबद्दल वेडय़ात काढताहेत. समीर सगळय़ांना तळमळून सुनावतात : कवितेबद्दल, तिच्या असोशीबद्दल.. एकूणच जगण्याबद्दल!

इकडे पुलं – सुनीताबाईंचा घरी-दारी शोध जारीच आहे. शेवटी बंगालीतली रवींद्रनाथांची ‘ती’ कविता सापडते.. एका पुस्तकात! धनश्रीला तिची फोटो-कॉपी देताना – ‘अगदीच नाही सापडली तर ही वापरा..’ असं सांगत – ‘पण सापडेल. रवींद्रनाथांच्या हस्ताक्षरांतली ती कविता नक्की सापडेल,’ असं आश्वासन देत सुनीताबाई अलिबाबाची गुहा धुंडाळतच राहतात.

कवितेच्या शोधाचा हा प्रवास म्हणजेच – ‘प्रिय भाई.. एक कविता हवी आहे!’  हा रंगाविष्कार!! रवींद्रनाथांची कविता शोधता शोधता पुलं आणि सुनीताबाईंना घडलेला भूतकाळातील आठवणींचा.. कवितांच्या तरल, रेशमी सहवासाचा, त्या कवींच्या हृद्य प्रसववेदनांचा, त्यांतून जन्मलेल्या अक्षर साहित्याचा हा रंगीबेरंगी कोलाज!

धनश्री त्याची साक्षीदार. आणि डॉ. समीरसह आपणही!

.. आणि एकदाची रवींद्रनाथांच्या हस्ताक्षरातली ती ‘स्वातंत्र्य’कविता सापडते! पुलं – सुनीताबाई धन्य धन्य होतात. आणि रितेही!

यानिमित्तानं का होईना, कविता जगता आली, हृदयाशी धरता आली याचा अनिर्वचणीय आनंद सोहळा अनुभवता आला होता त्यांना! पुन्हा तरुणपणीचे ते कवितावेडे क्षण जगले होते ती दोघं. त्याबद्दलची कृतज्ञता सुनीताबाईंनी डॉ. समीरना फोन करून व्यक्त केली. त्यांचा एकेक शब्द  म्हणजे ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असं पाडगावकर का म्हणाले याचा जणू अनुभूतीक्षणच!

रवींद्रनाथांच्या कवितेचा हा हृदयस्पर्शी शोधप्रवास डॉ. समीर कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केला आहे. या संहितेतला जीवनप्रवास रंगमंचावर आविष्कारित केलाय दिग्दर्शक अमित वझे यांनी. कविता जगणं म्हणजे काय, हे या दोघांनीही इतक्या समर्थपणे मंचित केलंय, की त्या नादात वाहवत गेले नाहीत तर ते नर्मदेचे गोटेच ! मुक्तानं साकारलेल्या सुनीताबाई जणू पुनर्जन्म घेऊन आलेल्या. मुक्ता महान अभिनेत्री का आहे यांचा वानवळा यापेक्षा दुसरा तो काय? सुनीताबाईंचा आशीर्वाद तिला मिळाला आहे! शब्द – सूर – ताल – कवितेचा अनाहत नाद यांचा इतका अप्रतिम, सुरीला आविष्कार पुन्हा पाहण्या न मिळे! सगळेच कलाकार या कवितेच्या कोसळण्यात चिंब भिजलेत, एवढं सांगितलं तरी पुरे!