‘क्वांटिको’ या सीरिजमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्याच्या घडीला एक ग्लोबल आयकॉन झाली आहे. आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वातील प्रियांकाचा वावर आणि तिची लोकप्रियता पाहता तिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसून येत आहे. परदेशात जास्तीत जास्त वेळ व्यतीत करणारी प्रियांका लवकरच ‘भारत’ चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे ‘भारत’नंतर तिला आणखी एक चित्रपट मिळाला असून  गुलदस्त्यात असलेल्या या चित्रपटाचं नाव अखेर जाहीर झालं आहे.

सलमान खानच्या आगामी ‘भारत’ चित्रपटामध्ये झळकण्यासाठी प्रियांका भारतात परतली असून आता तिच्या मानधनातही वाढ झाल्याचं दिसून येत आहे. ‘भारत’ चित्रपटासाठी प्रियांकाने तब्बल १४ कोटी रुपयांचे मानधन स्वीकारलं असून सर्वाधिक मानधन स्वीकारणा-या अभिनेत्रीच्या यादीमध्ये ती अव्वल स्थानावर असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र असं असूनही चित्रपट निर्मात्या सोनाली बोस यांनी त्यांच्या आगामी चित्रपटासाठी प्रियांकाची निवड केल्याचं पाहायला मिळालं.

सोनाली बोस यांचा आगामी चित्रपट आयशा चौधरी हिच्या जीवनावर आणि तिने लिहीलेल्या ‘माय लिटिल एपिफेनिस’ या पुस्तकावर आधारित आहे. सोनाली बोस यांनी केवळ चित्रपटाची घोषणा केली होती. मात्र नाव जाहीर केले नव्हतं. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती. याकारणामुळेच  या चित्रपटाचं नाव नुकतंच जाहीर झालं असून ‘द स्काय इज पिंक’ असं या चित्रपटाचं नाव निश्चित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत या चित्रपटाच्या नावाविषयी चाहत्यांना सांगितलं. त्यामुळे प्रियांका सोनाली बोस यांच्या ‘द स्काय इज पिंक’मध्ये झळकणार असल्याचं निश्चित झालं आहे. हा फोटो पोस्ट करत प्रियांकाने ‘तयारी सुरु झाली आहे’ असं नमूद केलं आहे. तर लेखिका सोनाली बोस आणि हिंदी संवाद जुही चतुर्वेदी यांच्या नावाचाही समावेश केला आहे.

दरम्यान, लहानपणापासूनच वकृत्वाचे कौशल्य मिळालेल्या आयशा चौधरीने तिच्या मृत्युपूर्वी ‘माय लिटिल एपिफेनिस’ हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. वयाच्या १८ व्या वर्षी जगाचा निरोप घेणा-या आयशाच्या याच पुस्तकावर आधारित ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाचं चित्रिकरण ऑगस्ट महिन्यामध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करण्यात येणार आहे.