आपल्या अभिनयाने केवळ बॉलीवूड नाही तर हॉलीवूडलाही वेड लावणारी बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा क्वांटिको सिरीजने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. क्वांटिकोच्या पहिल्या सिजननंतर आता क्वांटिको २ मध्येही ती अॅलेक्स पॅरिशची भूमिका साकारणार आहे. नुकताचं क्वॉटिको रिटर्न्सचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या सिजनमध्ये प्रियांका चोप्रा आणि जॅक मॅकलाफलिन यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहावयास मिळू शकते. याव्यतिरीक्त यात जोहाना ब्रॅडी आणि यास्मिन अल मास्री यांच्याही भूमिका आहेत.
क्वांटिको २ मालिकेत केवळ रोमान्सचं नाही तर परिपूर्ण अॅक्शनचाही आनंद घेता येणार आहे. पहिल्या सिजनच्या तुलनेत यात अॅक्शनचा अधिक भरणा करण्यात आल्याचे वृत्त फिल्मी मंकीने दिले आहे. क्वांटिकोच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून नव्या सिरीजचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या महिन्याच्या २५ तारखेपासून ही मालिका सुरु होणार आहे.
‘क्वाटिंको २’ शिवाय प्रियांका ‘बेवॉच’ या चित्रपटामध्येही साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती हॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय. यात अलेक्झांड्रा दद्दारिओ, इलफेनेश हॅडेरा आणि केली या अभिनेत्री तसेच ड्वेन जॉन्सन (रॉक), झॅक एफरॉन, जॉन बॅस हे कलाकारही झळकणार आहेत. इतकेच नाही तर प्रियांका आता मराठी चित्रपटसृष्टीतही पदार्पण करतेय. व्हेंटिलेटर या मराठी चित्रपटाची निर्मिती ती करणार असून हिंदीतील दिग्दर्शक राजेश म्हापुसकर याचे दिग्दर्शन करणार आहेत. सिनेसृष्टीतील मातब्बर मंडळी व्हेंटिलेटरच्या निमित्ताने एकाच पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असल्याचे, दिग्दर्शक राजेश म्हापुसकर यांनी म्हटले आहे.