ऑस्कर सोहळ्याच्या रेड कार्पेटवर जगाचे लक्ष वेधून घेणारी प्रियांका नेहमीच अनेक कारणांनी चर्चेत असते. कधी तिच्या लग्नाची चर्चा रंगते, तर कधी तिच्या बिनधास्त वक्तव्याने ती चर्चेत दिसते. बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील चर्चेसोबतच सोशल मीडियावरील सक्रियतेतून प्रियांका अनेकदा तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. याच माध्यमातून प्रियांका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र सध्या ती चित्रपट किंवा हॉलिवूड मालिकेच्या प्रसिद्धीसाठी नव्हे, तर तिने शेअर केलेल्या नवीन आणि एका अनोख्या फोटोंमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.  प्रियांका नुकतीच मावशी झाली असून तिने भाचीचे काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. प्रियांकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चिमुकलीसोबत खेळतानाचे शेअर केलेले फोटो मनमोहक असेच आहेत. त्यामुळेच या फोटोंना सध्या चांगलीच लोकप्रियता मिळताना दिसत आहे.

यापूर्वी ऑस्करसोहळ्यामध्ये प्रियांकाने परिधान केलेला ड्रेसची चांगलीच चर्चा रंगली होती. राल्फ आणि रुस्सोने डिझाईन केलेला पांढऱ्या आणि चंदेरी रंगाचा आकर्षक गाऊन परिधान करून प्रियांकाने ८९ व्या ऑस्कर सोहळ्यात रेड कार्पेटवर अवतरली होती. या ड्रेससोबत तिच्या कानातील डायमंड रिंग, बाजूला भांग असलेली स्ट्रेट केसांची हेअर स्टाईल आणि हातात घातलेली हॅण्डकफ्स प्रियांकाच्या सौंदर्यात अधिक भर घातल्याचेही ऐकायला मिळाले.   एवढ्यावरच प्रियांकाविषयीची चर्चा थांबली नव्हती, तर ती रेड कार्पेटवर कोमासोबत मिरवते या चर्चेला देखील उधान आल्याचे पाहायला मिळाले.  या मंचावर ती आगामी ‘बेवॉच हॉलिवूडपटातील सह-अभिनेता ड्वेन जॉनसनसोबत अधिक वेळ घालविल्याचीही चांगलीच चर्चा रंगली.


ऑस्कर पुरस्कार सोहळ्यानंतरच्या पार्टीतही या ‘बेवॉच’ गर्लचा ग्लॅमरस लूक पाहावयास मिळाला. प्रियांकाने पार्टीत काळ्या रंगाचा गाउन परिधान केला होता. यामध्ये ती अधिक मादक दिसली. पार्टीतील काही फोटो प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. ऑस्करच्या रेड कार्पेटवर आपल्या अदांनी घायाळ करणा-या प्रियांकाने या पुरस्कार सोहळ्याच्या मंचामागेही बरीच मजामस्ती करताना दिसली. तिने मंचामागे टकिला शॉट्सही लावले. एका परदेशी वृत्तवाहिनीने प्रियांका टकिला शॉट्स मारत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडिओला देखील चांगलीच पसंती मिळाली. बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये स्थिरावणारी प्रियांकाच्या नावाची चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही असेच म्हणावे लागेल. चित्रपटाशिवाय ती काय करते? हे जाणून घेण्यासाठी तिचा चाहतावर्ग नेहमीच आतूर असल्याचे दिसते. आपल्या चाहत्यांची ही इच्छा प्रियांका देखील सोशल मीडियातील सक्रियतेतून पूर्ण करते. तिने नुकतेच शेअर केलेले फोटो हे त्याचेच एक उदाहरण आहे, असे म्हणावे लागेल.