स्वच्छतेचा मुद्दा सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानात आता अभिनेत्री प्रियांका चोप्रासुद्धा सहभागी झालीये आणि वॉल आर्टच्या रुपात ती जनजागृती करताना आपल्याला दिसणार आहे. या अभियानाबद्दल अत्यंत उत्सुक असलेल्या प्रियांकाने इन्स्टाग्रामवर पोस्टसुद्धा शेअर केलाय. या पोस्टमध्ये तिने ‘बदल हा घरातूनच होतो आणि वॉल आर्टच्या रूपात मला साकारणार येणार याचा मला अभिमान आहे. सार्वजनिक ठिकाणी कलाकृती, ग्रॅफिटी, वॉल आर्टच्या रुपात केलेली जनजागृती लोकांना जास्त आवडते असं मला वाटतं. मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यात आपल्या सर्वांना सहकार आवश्यक आहे.’ असं म्हटलंय.

या वॉल आर्टमध्ये प्रियांका मेरी कोमच्या रूपात दिसणार आहे. ‘कचऱ्याला शहराबाहेर काढा’ असा संदेशसुद्धा या वॉल आर्टमध्ये असणार आहे. दरम्यान प्रियांकाकडे आणखी तीन बॉलिवूडचे प्रोजेक्ट्सदेखील आहेत. हॉलिवूडमधील ‘बेवॉच’मध्ये भूमिका साकारल्यानंतर प्रियांका लवकरच एका बॉलिवूड सिनेमाच्या शूटींगला सुरूवात करणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात ती भूमिका साकारणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वच्छतेविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत. सलमान खान, अक्षय कुमार यांसारखे अनेक सेलिब्रिटी यासाठी पुढाकार घेत आहेत. अभिनेता अक्षय कुमारचा आगामी ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानावर आधारित आहे. लोकांनी उघड्यावर शौच न करता शौचालयाचा वापर करावा यासाठी अक्षय सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.