मराठी रंगभूमीचा प्रेक्षक हा केवळ मनोरंजनासाठी नाटक बघत नाही, तर त्याला वेगळं, काहीतरी आशयघन अनुभवायचं असतं असा ठाम विश्वास व्यक्त करत अभिनेता पुष्कर श्रोत्री आपल्या आगामी नाटकाबद्दल बोलत होता. ‘श्श… घाबरायचं नाही’ या नाट्यपूर्ण सादरीकरणात तो एक वेगळ्या शैलीतील, वेगळ्या स्वरुपातील अभिनय करताना दिसणार आहे.

पुष्कर श्रोत्रीने काय म्हटलं आहे?

“मी काय वेगळं करू शकतो?” या विचारातून या सादरीकरणाची कल्पना जन्माला आली, असं पुष्कर सांगतो. “माझ्या करिअरमध्ये मी अनेक प्रकारची नाटकं केली, पण मतकरींच्या गूढशैलीतील संहितेला रंगमंचावर बोलकं करणं ही एक वेगळीच जबाबदारी आहे,” असं तो म्हणतो. बदाम राजा प्रॉडक्शन आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांच्यासोबत यापूर्वी ‘अ परफेक्ट मर्डर’ सारखं सस्पेन्स नाटक साकारताना पुष्करला जाणवलं की विनोदी नाटकांच्या गर्दीत प्रेक्षक काही तरी वेगळं शोधत असतो. आणि म्हणून मतकरींच्या गूढ कथांना नाट्यरूप देण्याचा विचार केला.

रत्नाकर मतकरी हे मराठी साहित्यातलं असं नाव आहे, जे मराठी सृजनविश्वात कायमस्वरूपी कोरले गेलेलं आहे. त्यांनी गूढ कथांच्या माध्यमातून मराठी साहित्यात एक स्वतंत्र आणि प्रभावी वाट निर्माण केली. त्यांच्या कथा भयाच्या पलीकडची, माणसाच्या अंतर्मनाशी बोलणाऱ्या आहेत आणि त्याच लेखनशैलीला नव्या स्वरुपात उलगडण्याचा ध्यास घेऊन हा नाट्यप्रयोग साकारला जातोय.

‘श्श… घाबरायचं नाही’ ही दोन गूढ कथांची नाट्यात्मक मांडणी

‘श्श… घाबरायचं नाही’ ही दोन गूढ कथांची नाट्यात्मक मांडणी असून, वाचनपुरती मर्यादित न ठेवता, ती प्रेक्षकांसमोर प्रकाशयोजना, आवाज, अभिनय आणि दृश्य माध्यमांद्वारे एक सजीव अनुभव म्हणून उभी राहते. पुष्कर सांगतो की, “जगभरात सस्पेन्स, मिस्ट्री, थ्रिलर या जॉनरला तरुण प्रेक्षक आकर्षित होतोच. मग मराठी रंगभूमी याला अपवाद का ठरावी? मतकरींची भाषा बोलायला मिळणं ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. ती भाषा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्यच आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतकरींची खास लेखन शैली

या संकल्पनेची निर्मिती ‘बदाम राजा प्रॉडक्शन’ने केली असून, नावीन्य आणि परंपरेचा मेळ साधणाऱ्या या संस्थेने अनेक धाडसी प्रयोग साकारले आहेत. ही कलाकृती केवळ सादरीकरण नाही, तर एक संवेदनशील सांस्कृतिक दुवा आहे जो मतकरींच्या लेखनातून प्रेक्षकांच्या मनात थेट भिडतो.‘श्श… घाबरायचं नाही’ हे सादरीकरण रत्नाकर मतकरी यांच्या साहित्याचा, शैलीचा आणि प्रभावाचा नवा आविष्कार आहे. प्रेक्षकांसाठी ती एक साक्षात जिवंत आठवण ठरणार आहे आणि नव्या पिढीसाठी, मराठी गूढसाहित्याशी जोडणारी एक सशक्त वाट. ‘श्श… घाबरायचं नाही’चा शुभारंभाचा प्रयोग बुधवार, ३१ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता, मुंबईतील ऑपेरा हाऊस येथे सादर होणार आहे.