साहित्यावर आधारित चित्रपट आणि मालिकांची निर्मिती होते. वेळप्रसंगी चित्रपट गाजल्यावर किंवा निर्मितीची प्रक्रिया सुरू असताना त्याच्यावर पुस्तकही काढले जाऊ शकते. मात्र, एखादा चित्रपट गाजला म्हणून तो मालिका स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न याआधी कोणीही केलेला नाही.
बॉलिवूडचे अनेक दिग्गज छोटय़ा पडद्यावर अभिनव प्रयोग करत वेगवेगळे विषय छोटय़ा पडद्यावर मांडताना दिसत आहेत. मात्र, दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी एक हटके प्रयोग करायचे ठरवले आहे. त्यांचा गाजलेला ‘रांझना’ हा चित्रपट मालिका स्वरुपात दाखवण्याचा त्यांचा विचार असून त्यासाठी चित्रपटाची नव्याने कथा लिहिण्याचे काम सुरू झाले आहे.
धनुष आणि सोनम कपूर यांची मुख्य भूमिका असलेला आनंद एल. राय दिग्दर्शित ‘रांझना’ या चित्रपटाला तिकीटबारीवर प्रचंड यश मिळाले होते. समीक्षकांनाही हा चित्रपट खूप आवडला होता. म्हणून या चित्रपटाला मालिका रुपात आणण्यासाठी आनंद राय प्रयत्नशील आहेत. ‘रांझना’ची कथा अत्यंत वेगळी आणि नाटय़पूर्ण होती. त्या चित्रपटातील कथानकात जो घटनाक्रम आहे त्यात प्रत्येक घटनेला, छोटय़ा छोटय़ा प्रसंगांना वेगवेगळे पदर आहेत. तो प्रत्येक प्रसंग, व्यक्तिरेखा अत्यंत वेगळ्या पध्दतीने पुन्हा मांडली जाऊ शकते एवढे नाटय़ त्यात आहे. पण, मोठय़ा पडद्यावर चित्रपट करताना तो तीन तासांत बांधण्यासाठी तुम्हाला कथाविस्तारावर अनेक मर्यादा येतात, असे आनंद एल. राय यांनी सांगितले. त्यामुळे ‘रांझना’ची कथा मालिका स्वरूपात आणली तर ते नाटय़ लोकांसमोर नव्याने रंगवता येईल, या विचाराने चित्रपट मालिका स्वरूपात आणणार असल्याचे राय यांनी सांगितले.
‘रांझना’ चित्रपट मालिका म्हणून बेतताना आपण केवळ निर्मात्याच्या भूमिकेपुरती मर्यादित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raanjhanaa movie now in serial format
First published on: 15-11-2014 at 01:12 IST