स्टार प्रवाहवरील ‘गोठ’ मालिकेत येणार महत्त्वाचं वळण

मनमोकळं, मनस्वी जगणारी शिरोडकरांची राधा लग्नाची हळद लावून नवं आयुष्य जगण्याची स्वप्न पहात आहे. पण, तिचा कायम तिरस्कार करणारी बयो आजी राधाच्या लग्नात विघ्न आणणार आहे. मात्र, बिनधास्तपणे वावरणारी राधा बयो आजीचं हे कारस्थान हाणून पाडणार का, हे पहाणं पाहण्यासारख असणार आहे.

स्टार प्रवाहवरील गोठ ही मालिका आता महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. ‘स्त्रियांचे निर्णय स्त्रियांच्या हाती’ असा विचार ही मालिका मांडत आहे. मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभतो आहे. सातत्यानं कथानकात येणारी वळणं मालिकेविषयी उत्सुकता निर्माण करत आहेत. मात्र, आता मालिकेला वेगळंच वळण मिळणार असल्याचं चित्र आहे. लग्नाचा साज लेवून राधा आनंदात असताना बयो आजी म्हापसेकर हे लग्न मोडण्याचा प्रयत्न करत आहे. राधाला त्रास देण्याचे या पूर्वीचे तिचे प्रयत्न सफल झालेले नाहीत. त्यामुळे सर्वांपुढे राधानं केलेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी बयो आजीनं मोठी विचित्र खेळी खेळली आहे. त्यासाठी तिनं अभय म्हापसेकरला हाताशी धरलं आहे.

ज्या अभिषेकशी राधाचं लग्न ठरलं आहे, त्याला फितवण्याचा डाव अभयनं खेळला आहे. त्याच्या या डावाला अभिषेक बळी पडतो का ?, बयो आजी अपमानाचा बदला घेते का ?, की सर्वांच्या खेळ्या हाणून पाडत राधाचं लग्न निर्विघ्न पार पडतं हे पहाणं रंजक ठरणार आहे. या आणि पुढच्या आठवड्यात राधाच्या लग्नाचे हे नाट्य घडणार आहे. नीलकांती पाटेकर, राजन भिसे, समीर परांजपे, रुपल नंद, सुशील इनामदार, विवेक गोरे, ऋता काळे, सुप्रिया विनोद, शलाका पवार, लतिका गोरे या कसलेल्या कलावंतांच्या अभिनय जुगलबंदीने स्टार प्रवाहवरील ही मालिका विशेष रंगणार आहे.